श्रीरामपूर : अहमदनगर विभागीय सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या वनपरीक्षेत्र कार्यालयांमध्ये अनागोंदी माजली आहे. वनपरीक्षेत्राचे वनक्षेत्रपाल शासकीय कार्यालयाला आपली खासगी मालमत्ता समजून मनमानी कारभार करत आहेत. भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून कोट्यवधी रुपयांच्या कामांची माहिती जनतेपासून लपविली जात आहे. रेंजचे 'आरएफओ' कार्यालयात उपस्थित राहत नाही. माहिती अधिकारांतर्गत व अपिल सुनावणीनंतरही माहिती दिली जात नाही. यासंदर्भात 'साईकिरण टाइम्स'चे संस्थापक राजेश बोरुडे यांनी कसूरदार 'आरएफओं'ची विभागीय वन अधिकारी व सहाय्य्क वनसंरक्षकांकडे प्राथमिक तक्रार केली आहे. दरम्यान, दोषी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यास विभागीय वन अधिकारी दिरंगाई करत असल्याने कसूरदार आरएफओ व विभागीय वन अधिकाऱ्यांची तक्रार प्रधान वनसंरक्षकांकडे करून दोषी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी धरणे आंदोलन, ठिय्या, उपोषण करणार असल्याचा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे.
विभागीय वन अधिकाऱ्यांचा वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांवर वचक राहिला नाही. शासकीय निधीने स्वतःची घरे भरण्याचे काम 'आरएफओ' करत असल्याचा आरोप करत माहिती का लपविली जात आहे? असा सवाल राजेश बोरुडे यांनी केला आहे. वरिष्ठ अधिकारी 'आरएफओं'ची पाठराखण करत असल्याने सामाजिक वनीकरण विभागातील भ्रष्टाचारात वरिष्ठ अधिकारीही सामील असल्याचे उघड होत आहे.
राजेश बोरुडे यांनी कोपरगाव व राहाता सामाजिक वनीकरण कार्यालयाचे आरएफओ निलेश रोडे व सुनील मेहेरे यांच्या दिरंगाईबाबत तक्रार केली आहे. आरएफओ रोडे व मेहेरे हे कार्यालयात उपस्थित राहत नाही. कोपरगाव सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांनी राजेश बोरुडे यांचे हे माहिती अधिकर अर्ज स्वीकारले नाही, माहिती दिली नाही. सामाजिक वनीकरण विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून निलेश रोडे माहिती देत नाही.
आदेश देऊनही माहिती देत नाही...
राहाता, कोपरगाव सामाजिक वनीकरण कार्यालयात अनागोंदी माजली आहे. करोडो रुपयांच्या कामात मोठी अनियमितता असल्याने वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील मेहेरे व निलेश रोडे कोणतीही माहिती देत नाही. अपिल सुनावणी आदेश देऊनही राजेश बोरुडे यांना माहिती दिली नाही. सहाय्यक वन संरक्षककांच्या आदेशाला आरएफओ जुमानत नाही.
फोटो काढण्यास मज्जाव...
![]() |
राहाता सामाजिक वनीकरण कार्यलयातील वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील मेहेरे कार्यालयात उपस्थित राहत नाही. |
राजेश बोरुडे हे राहाता येथील सामाजिक वनीकरण कार्यलयात माहिती घेण्याकरिता वेळोवेळी गेले असता, वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील मेहेरे तेथे उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. अनेकदा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला परंतु, मेहेरे यांनी प्रतिसाद दिला नाही. वनक्षेत्रपाल सुनील मेहेरे वारंवार कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने राजेश बोरुडे यांनी त्यांच्या खुर्चीचा फोटो काढत असताना तेथील वनपाल श्री दळवी यांनी फोटो काढण्यास मज्जाव केला. दरम्यान, राजेश बोरुडे यांनी पोलिसांना बोलवा, माझ्यावर गुन्हा दाखल करा, असे आव्हान दिले. आम्ही चोर नाही. माहिती घेण्यासाठी आलो. अधिकारी उपस्थित राहत नसतील तर त्यांना जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. शासकीय कार्यालय आहे. कोणाची खासगी मलमत्ता नाही, असे राजेश बोरुडे यांनी ठणकावून सांगितले.
अहमदनगर जिल्यातील सामाजिक वनीकरण कार्यालयात आरएफओ उपस्थित राहत नसल्याने बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित करावी, असे राजेश बोरुडे यांनी तक्रारीत म्हंटले आहे.