अहमदनगर जिल्ह्यातील अकोले शहरात मोटार ड्रायव्हिंग स्कूलकडुन संगणकीय प्रणालीचा दुरुपयोग करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला असून, याकडे श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला आहे. यात सामील असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची तक्रार बोरुडे यांनी केली आहे.
नियमबाह्य पद्धतीने अवजड वाहन चालक प्रशिक्षण प्रमाणपत्र व वाहन चालक परवाने देण्यात येते, ही अतिशय गंभीर बाब असून श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत. अप्रमाणित, अप्रशिक्षित ड्रायव्हिंग स्कुलमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. चुकीच्या पद्धतीने अवजड वाहन चालक प्रशिक्षण प्रमाणपत्र देणे, अवजड वाहन चालकांना लहान कारवर प्रशिक्षण देणे या सर्व बाबींची सखोल चौकशी करावी, नियम धाब्यावर बसवून परवाने देणाऱ्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे परवाना कायमस्वरूपी रद्द करून अहमदनगर जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने अवजड वाहन चालक प्रशिक्षण प्रमाणपत्र देणाऱ्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी व चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे. यासंदर्भात 'साईकिरण टाइम्स'चा पाठपुरावा सुरुच राहणार आहे.