डॉ मुरकुटे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीचा नेण्याचा ठराव करताना राज्य शासनाने गुणवत्तेचा विचार केला नाही. शिर्डी हे ठिकाण सतत भाविकांनी गजबजलेले असते. त्यातही परप्रांतीयांचा भरणा अधिक असतो. कधी कधी तेथे पाय ठेवायलाही जागा नसते. मग हा आटापिटा कशासाठी?
क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक असून त्यासाठी श्रीरामपूर हेच मुख्यालय म्हणून योग्य असल्याचा अहवाल यापूर्वी महसूल विभागाने दिलेला आहे. अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी, नेवासे या तालुक्यांना श्रीरामपूर हेच मध्यवर्ती आहे .प्रादेशिक परिवहन कार्यालय, सुसज्ज बस स्थानक ,औद्योगिक वसाहत ,रेल्वे स्टेशन ,पोस्ट ऑफिस ,दूरसंचार भवन अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आधी सर्व सुविधा श्रीरामपूर येथे उपलब्ध असून श्रीरामपूर जिल्हा झाल्यास नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शहरालगतच शेती महामंडळाची मुबलक जमीन उपलब्ध आहे.
श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे हा विचार तालुक्यातील प्रत्येकाच्या मनी मानसी रुजलेला आहे त्यासाठी आंदोलने झाली आहेत शासकीय दरबारी शिष्टमंडळाद्वारे मागण्या करण्यात आलेले आहेत या मागणीला शासनाने तर्फे सकारात्मक प्रतिसादही मिळालेला आहे. श्रीरामपूरकर आता फक्त घोषणाची वाट पाहत आहेत. अशा निर्वाणीच्या क्षणी कुणी राजकीय हव्यासापोटी श्रीरामपूरच्या तोंडाचा घास हिसकावून घेणार असेल तर गप्प बसणे श्रीरामपूरकरांना परवडणारे नाही. श्रीरामपूर जिल्हा व्हावा हा श्रीरामपूरकरांच्या अस्मितेचा प्रश्न आहे .आमच्या भावभावनांची कदर न करता कुटील डाव खेळणाऱ्यांना श्रीरामपूर जनता कधीही माफ करणार नाही. राजकीय व शासकीय सत्तेचा वापर श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी करा हीच आमची नम्रतेची मागणी आहे. श्रीरामपूरकरच्या तोंडाला पाणी पुसण्याचा कुटील डाव आम्ही सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन हाणून पाडू. श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे यासाठी सनदशील मार्गाने लढत राहू असेही डॉ. वंदना मुरकुटे यांनी म्हटले आहे.