ऑनलाईन फुड डिलेव्हरी'ला श्रीरामपुरातील हॉटेल चालकांची नापसंती


श्रीरामपूर
: खवैय्यांचे शहर म्हणून ओळख  असलेल्या श्रीरामपूरात ऑनलाईन फुड डिलिव्हरी करणारया कंपन्यांची सेवा अल्पायुषी ठरली आहे. ऑनलाईन फुड डिलिव्हरी करणारया कंपन्या ग्राहकांना  देणारा डिस्काउंट हॉटेलमालकांकडून  वसूल करत असल्याने हॉटेल  व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ऑनलाईन ऑर्डर नको रे बाबा, असे  म्हणण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. हॉटेलचालकच ऑर्डर स्वीकारत नसल्याने अनेक बड्या ऑनलाईन फुड डिलिव्हरी कंपन्यांना शहरातून आपली सेवा बंद करावी लागली आहे.  

पाच वर्षांपूर्वी शहरामध्ध्ये ऑनलाईन फुड डिलिव्हरी कंपन्यांनी ग्राहकांना घरपोच ऑर्डरनुसार खाद्य पदार्थांची ऑर्डर देणे सुरू केले. या सेवेला  श्रीरामपूसह लगतच्या गावांतूनही  प्रतिसाद मिळाला. नोकरी, धंद्याच्या  निमित्ताने बाहेर राहाणारया वर्गाला रात्री  थकल्यामुळे हॉटेलमध्ये जाऊन जेवणे  त्रासदायक ठरते. अशा ग्राहकांसाठी  आॅनलाईन फुड डिलिव्हरी सेवा  गरजेची ठरली. सुरुवातीला कंपन्या  हॉटेलचालकांकडून आॅनलाईन आॅर्डर  दिल्याबद्दल एकूण बिलाच्या १२ टक्के  कमिशन घेत होत्या. २०१९ मध्ये हे  कमिशन २० टक्क्यांपर्यंत वाढले. 

 २०२० मध्ये कोविड आल्यामुळे  आॅनलाईन फुड डिलिव्हरीला आणखी  मागणी वाढली. यामुळे चार पाच कंपन्या  मिळून शहरात ५० तरुणांना रोजगारही  उपलब्ध झाला होता; परंतु या कंपन्यांची  नफेखोर वृत्ती वाढत गेल्याने सध्या  हॉटेलचालकांकडून  या कंपन्या ३०  टक्क्यांपर्यंत कमिशन  घेऊ लागल्या.  एकीकडे वाढलेले  किराणा, भाजीपाल्याचे  भाव दुसरीकडे  व्यवसायातील स्पर्धेमुळे  खाद्यपदार्थांची  भाववाढ तात्काळ  करणे अशक्य  असल्याने आॅनलाईन कंपन्यांची  आॅर्डर हॉटेलचालकांना परवडतच  नाही. 

त्यामुळे शहरातील बहुतांशी  बड्या हॉटेलांनी या कंपन्यांबरोबर  काम करण्यास नकार दिला आहे.  पाचपैकी आता अवघी एक कंपनी  शहरात आॅनलाईन फुड डिलिव्हरीची  सेवा देत आहे. बड्या कंपन्यांबरोबर  काही छोट्या कंपन्यादेखील या सेवा  क्षेत्रात येत आहेत. त्यांनी आॅर्डरमागे  कमिशन १० ते १२ टक्के ठेवल्यास  हॉटेलचालक पुन्हा आॅनलाईन ग्राहकांना  फुड डिलिव्हरी देऊ शकतील. 

कंपन्या व हॉटेल व्यावसायिकांनी सुवर्णमध्य  काढून महानगराप्रमाणे श्रीरामपूरसारख्या  छोट्या शहरातही सेवा देत ग्राहकांचे  हित पाहावे, या सेवेमुळे नोकरदार  वर्गाची सोय झाली आहे. ही गैरसोय  टाळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी  अपेक्षा ग्राहक सोपान भगत यांनी व्यक्त  केली. 

ग्राहकांना सुट, हॉटेलमालकाची लूट  

आॅनलाईन कंपन्या त्यांच्या अ‍ॅपवरून आॅर्डर  बुक करणारया ग्राहकांना भरघोस सुट देतात,  परंतु प्रत्यक्षात ही सुट हॉटेलचालकांच्या  माथी मारली जाते. ग्राहकांना सवलत  दिल्याचे दाखवून या कंपन्या आपले नाव  मोठे करतात, आणि हॉटेल मालकांची लूट  करतात. पैसे आणि वेळ वाचविण्यासाठी  अनेक ग्राहक आॅनलाईन फुड मागवतात.  परंतु कंपन्यांच्या मनमानी कमिशनमुळे  आॅनलाईन फुड डिलिव्हरी करणे अवघड  बनले आहे. -विकी गुप्ता, हॉटेल मालक 

श्रीरामपूरसारख्या निमशहरी भागात दर्जेदार  फुड डिलिव्हरी बॉयचा अभाव आहे.  ग्राहकांना चांगली वागणूक देणारा  डिलिव्हरी बॉय अपेक्षित असतो. तसेच  या कंपन्यांनी वाढवलेले कमिशन  या सेवेतील कळीचा मुद्दा आहे. या  दोन कारणांमुळे श्रीरामपूरसारख्या  शहरातून फुड डिलिव्हरीतील बड्या  कंपन्यांना वॉकआऊट करावे लागले  आहे. एखाददुसरया कंपनीची सेवा  सुरू असली, तरी हॉटेलचालक  या प्लॅटफॉर्मवरून आलेली आॅर्डर  स्वीकारण्यास इच्छुक नाहीत. - सत्यजित लबडे, हॉटेल व्यावसायिक

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post