तालुकास्तरीय मिशन वात्सल्य शासकीय समितीच्या बैठकीत या शिबिराचे नियोजन करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शिबीर होणार आहे. नायब तहसीलदार चारुशीला मगरे- सोनवणे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या प्रभारी प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे यांनी शिबिराच्या आयोजनाबाबत बैठकीत सविस्तर माहिती दिली. तसेच सर्व उपस्थित विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना या शिबिरामध्ये आपापल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या शिबिरासाठी येणाऱ्या महिलांचे सरकारी कार्यालयांशी संबंधित रखडलेले प्रलंबित प्रश्न सुटून त्यांचे खऱ्या अर्थाने समाधान व्हावे या दृष्टिकोनातून शिबिराची आखणी करून रुपरेषा व नियोजन व्हावे अशी सूचना समिती सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी केली. विविध शासकीय योजनांची माहिती देणारी माहिती पत्रके शिबिर स्थळी महिलांना द्यावेत अशी सूचना सदस्य बाळासाहेब जपे यांनी केली. बालसंगोपन योजनेबाबत तालुका संरक्षण अधिकारी दीपाली भिसे यांनी माहिती दिली. विद्या क्षिरसागर यांनी बचत गटांना बँक अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार मांडली.
नगरपालिका, पंचायत समिती, महसूल (सेतु, तलाठी), कृषी, आदिवासी, महिला आर्थिक विकास महामंडळ, अन्न व नागरी पुरवठा (रेशन), शिक्षण, पोलीस, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (रस्ते), महावितरण (विद्युत विभाग), आरोग्य, बांधकाम व इतर कामगार मंडळासह सर्व सरकारी विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहुन महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे विहित मुदतीत निरसन होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
या बैठकीस दुय्यम निबंधक सतीश पोकळे, कृषी पर्यवेक्षक श्रीधर बेलसरे, पंचायत समितीचे सहायक प्रशासनाधिकारी व्ही. आर. गोडे, आरोग्य विभागाचे बी.सी. बनसोडे, विस्ताराधिकारी विजय चराटे, एस. टी. महामंडळाचे बबनराव जाधव उपस्थित होते.
शिबिरात नगरपालिका, महसूल(सेतु, तलाठी), कृषी, आदिवासी, महीला आर्थिक विकास महामंडळ, अन्न व नागरी पुरवठा (रेशन), शिक्षण, पोलीस(गृह), पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (रस्ते), महावितरण (विद्युत विभाग), आरोग्य, बांधकाम व इतर कामगार मंडळ इत्यादी सर्व विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहून महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे मुदतीत निरसन होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
वारस नोंदीसाठी आग्रह
पतीच्या निधनानंतर मालमत्तांच्या सरकारी कागदपत्रांवर वारस म्हणून एकल महिलांची नोंद लावण्याबाबत उदासीनता आहे. त्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून अशा वारस नोंदींचे काम प्राधान्याने करावे, अशी आग्रही भूमिका मिलिंदकुमार साळवे यांनी मांडली.
गैरहजर अधिकाऱ्यांना नोटिसा
मिशन वात्सल्य समिती व समाधान शिबिराच्या या नियोजन बैठकीसाठी सदस्य सचिव तथा प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे यांनी राज्य सरकारच्या सर्व कार्यालयप्रमुखांना पत्र पाठवून आमंत्रित केले होते. पण गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्याधिकारी, श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, शहर व तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक, तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी गैरहजर होते. गैरहजर अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्याचे निर्देश नायब तहसीलदार मगरे-सोनवणे यांनी दिले.