बेलापुरात लाखों रुपयांची जलशुद्धीकरण यंत्रणा धुळखात; ग्रामस्थ शुद्ध पाण्यापासून वंचित, ग्रामपंचायतीचा निष्क्रिय कारभार चव्हाट्यावर : शासनासह जनतेची फसवणूक ; राजेश बोरुडे यांची 'सीईओं'कडे तक्रार

बेलापूर : राजवाडा येथील जलशुद्धीकरण यंत्रणा बंद असल्यामुळे ग्रामस्थ शुद्ध पाण्यापासून वंचित राहत आहेत.

श्रीरामपूर ( राजेश बोरुडे ) : बेलापुरातील जॉगिंग ट्रॅकचे निकृष्ट काम चव्हाट्यावर आल्यानंतर गावाच्या विकासाचा डंका वाजवणाऱ्यांची मोठी नाच्चकी झाली. 'साईकिरण टाइम्स'ने जॉगिंग ट्रॅक आहे का भ्रष्टाचाराचा ट्रॅक आहे? असा सवाल करत प्रसारित केलेल्या वृत्ताची मोठी चर्चा झाली. समाज माध्यमावरही अनेकांनी संताप व्यक्त करत गाव अधोगतीकडे चालले असल्याची टीका केली. जॉगिंग ट्रॅकच्या दर्जाहीन कामाची चौकशी सुरु असतानाच आणखी एक संतापजनक बाब समोर आली आहे. ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी लाखों रुपये खर्च करून बसविलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणा अक्षरशः धुळखात पडून आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील खटकळी गावठाण, राजवाडा आदी ठिकाणच्या जलशुद्धीकरण यंत्रणांवर लाखों रुपये खर्च करूनही गावाकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. जलशुद्धीकरण यंत्रणा बंद ठेऊन ग्रामस्थांना वेठीस धरण्यात येत आहे. दरम्यान, जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वितच झालेली नसताना देयके अदा करून शासनासह जनतेची फसवणूक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची तक्रार राजेश बोरुडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे केली आहे.

'अनुसूचित जाती उपयोजना व नविन्यापूर्ण योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील गावांमध्ये शेडसह जलशुद्धीकरण यंत्रणा बसविणे' , या योजनेअंतर्गत ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने लाखों रुपये खर्चून ठिकाठिकाणी शेडसह जलशुद्धीकरण यंत्रणा बसविल्या. याच योजनेतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील खटकळी गावठाण, राजवाडा, गायकवाड वस्ती या ठिकाणी प्रत्येकी 5 लाख 39 हजार ,897 रुपये याप्रमाणे तीनही ठिकाणी तब्बल 16 लाख 19 हजार 691 रुपये रुपये खर्चून बसविलेली जलशुद्धीकरण यंत्रणा अक्षरशः धुळखात पडून आहे, बंद आहे. ही जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वितच केली नसताना देयके अदा केलीच कसकाय? असा सवाल राजेश बोरुडे यांनी उपस्थित केला आहे.

जलशुद्धीकरण यंत्रणेवर लाखों रुपये खर्च करून उपयोग काय..?
जलशुद्धीकरण यंत्रणेवर लाखों रुपये खर्च करून बेलापूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी शासनासह जनतेची घोर फसवणूक केली आहे. जलशुद्धीकरण यंत्रणा सुरूच झालेली नसताना देयके अदा केलीच कसकाय..? असा सवाल राजेश बोरुडे यांनी उपस्थित केला. एवढा खर्च करूनही जनतेला त्याचा लाभ मिळत नसेल तर उपयोग काय.? या यंत्रणेचा दोषनिवारण कालावधी 1 वर्षाचा आहे. दरम्यानच्या काळात जलशुद्धीकरण यंत्रनेच्या देखभाल-दुरुस्तीवर खर्च करण्यात आला आहे का? देखभाल दुरुस्तीचे बिले काढण्यात आली आहे का? पाण्याच्या शुद्धतेची वेळोवेळी तपासणी केली का? असे अनेक सवाल राजेश बोरुडे यांनी उपस्थित करून या सर्व प्रकाराची चौकशी, तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शासकीय निधी कोणाच्या घशात चालला...
शासनाच्या निधीची उधळपट्टी करण्याचे काम बेलापुरात सुरु आहे. मोठा गाजावाजा करत गावातील कामांचे उदघाटणे केली जातात. विकास कामे केल्याचा बोभाटा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच. विकास कामाच्या माध्यमातून केवळ अधिकारी, ठेकेदार पोसण्याचे काम सुरु आहे. अत्यंत निकृष्ट कामे करून शासनासह जनतेची घोर फसवणूक केली जात आहे. ठेकेदारमागे कोणाचा मुखवटा आहे, हे जनतेसमोर येत आहे.

जलशुद्धीकरण यंत्रणेचे तीनतेरा...
जलशुद्धीकरण यंत्रणेचे पाण्याचे पाईप तुटलेले, पाण्याचे जार अस्तव्यस्त पडलेले दिसले. जलशुद्धीकरण यंत्रावर धुळीचे थर लटकलेले. आजूबाजूला कचरा, अस्वच्छता होती.

ग्रामपंचायतीची जबाबदारी...
राजेश बोरुडे यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा श्रीरामपूर उपविभागाचे उप अभियंता रविंद्र पिसे यांना जलशुद्धीकरण यंत्रणा बंद असल्याबाबत विचारणा केली व त्याबाबतचे पुरावे, छायाचित्रे दाखविली. दरम्यान, उप अभियंता पिसे यांनी, जलशुद्धीकरण यंत्रनेची देखभाल-दुरुस्ती, चालू ठेवण्याची जबाबदारी आमची नाही, ग्रामपंचायतीची असल्याचे सांगितले.

जलशुद्धीकरण यंत्रनणेला जाळ्या लागल्या आहेत.

जलशुद्धीकरण यंत्रणेची सखोल चौकशी करून यंत्रणा बंद ठेऊन शासकीय निधीची उधळपट्टी करणाऱ्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई  करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, असे तक्रारीत राजेश बोरुडे यांनी म्हंटले आहे. दोषींवर लवकरात-लवकर कारवाई केली नाही तर प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे, असे समजून श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, उप अभियंता यांना घेराव घालण्यात येईल. काळे फासण्यात येईल. ठिय्या, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे. तक्रारीच्या प्रती वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आल्या असून पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे बोरुडे यांनी म्हंटले आहे.


खटकळी गावठाण येथील जलशुद्धीकरण यंत्रणा धुळखात पडून आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post