श्रीरामपूर : श्रीरामपूर पंचायत समितीत घरकुल योजनेचे प्रस्ताव मंजूर करण्यास दिरंगाई केली जात असून, अनेक लाभार्थी घरकुलाच्या लाभपासून वंचित राहत आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी दांडगे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, नागरिकांच्या हक्काच्या घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी 'बिडीओ'नां घेराव घालून जाब विचारणार असल्याचे शिवाजी दांडगे यांनी 'साईकिरण टाइम्स'ला सांगितले.
पंचायत समितीतील घरकुल योजनेशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना घरकुलाच्या लाभापासून मुकावे लागत आहे. चार महिन्यापासून दिलेले घरकुलाचे प्रस्ताव धुळखात पडले आहेत. लाभार्थ्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही. ज्यांनी घरकुलाचे प्रस्ताव सादर केले त्यांना लाभ मिळत नाही. अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देतात. अधिकारी मनमानी कारभार करून शासन निर्णयाची पायमल्ली करताना दिसत आहे.
पंचायत समितीत गेल्या ३ ते ४ वर्षापासून सक्षम व पूर्णवेळ गटविकास अधिकारी नसल्यामुळे अधिकारी-कर्मचारी कामामध्ये टाळाटाळ करत असल्याचा आरोप दांडगे यांनी केला. घरकुलाचे १५०० प्रस्ताव सादर झाले असून ज्या-ज्या लाभार्थ्यांना लाभ दिला त्यांची यादी जाहीर करावी. फक्त २६ घरकुले पूर्ण झाल्याचे शिवाजी दांडगे यांनी तक्रारीत म्हंटले आहे.