याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे महाले ज्वेलर्स या नावाने शोरुमचे अनाधिकृत गाळ्यामध्ये उद्घाटन गुरुवारी (ता.26) होणार होते. परंतू ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्याठिकाणी धाव घेऊन महाले ज्वेलर्स शोरुमचे उद्घाटन होऊ न देण्याचा निर्णय घेतला. तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे या शासकीय जागेवरील गाळ्याचे उद्घाटन ग्रामस्थांनी बंद पाडले.
याप्रसंगी गावातील सर्व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन या अनाधिकृत गाळ्यातील शोरुमच्या उद्घाटनास विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. या गाळ्याचे 26 जानेवारी रोजी उद्घाटन होऊन कार्यक्रम पत्रिका सोशल मिडीयावर दिवभर फिरत होती. त्यातच ज्या मान्यवर व पत्रकार बंधू यांची नावे टाकली त्यांनाही न विचारता पत्रिकेत नावे टाकल्याचे सांगून या अनधिकृत बांधकामास पाठींबा नसल्याचा खुलासा करण्यात आला होता. पत्रिकेत नाव टाकून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आमच्या नावाचा गौरवापर केला म्हणून महालेंच्या विरोधात अशोक कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची उद्घाटनाच्या अगोदच्या दिवशी गावात पूर्ण चर्चा होती. त्यामुळे उद्घाटनाचे काय होणार याची उलट सुलट चर्चा गावात होती. तसेच या अनाधिकृत गाळ्यासंदर्भात भाजपचे जिल्हा कार्यकर्ते नारायण काळे यांनी मुंडन आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र उर्फ मल्हार रणनवरे यांनी आंदोलन करण्यासंदर्भात तहसीलदार व संबंधित शासकीय अधिकार्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार नारायण काळे व मल्हार रणनवरे यांनी उद्घाटन रद्द करण्याचा आदेश असूनही गाळा उघडल्याने सकाळी साडेदहा वाजता आंदोलनास सुरुवात केली. या गाळ्यामध्ये निमंत्रक महाले यांनी दुकानाच्या उद्घाटनाच्या सुरक्षेसाठी महिला व पुरुष बाऊन्सर उभे केल्याने तसेच शासनाचा आदेश डावलून उद्घाटन होत असल्याने ग्रामस्थांचा पारा चढला. ग्रामस्थ व दुकानातील कर्मचारी यांत खडाजंगी झाली. मंडळ अधिकारी ओहळ, कामगार तलाठी भडकवाल व ग्रामसेवक ढुमणे यांनी शासकीय स्तरावरुन आलेल्या आदेशाची प्रत त्यांना देऊन व गाळ्याला चिकटवून सदर गाळा बंद करण्याचा आदेश दिला.
यावेळी सरपंच अर्चना रणनवरे यांनी खुलासा केला की, अनधिकृत बांधकामास आमचा पाठींबा नाही. तसेच आम्हाला न विचारताच कार्यक्रम पत्रिकेत नाव टाकल्याचे त्या म्हणाल्या. याप्रसंगी अशोक कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, शिवाजीराव शिंदे, मयुर पटारे, सुनिल बोडखे, गणेश पवार, भाऊसाहेब पटारे, ‘अशोक’ चे संचालक यशवंत रणनवरे, माजी व्हा.चेअरमन दत्तात्रय नाईक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनी या अतिक्रमण गाळ्याची मोठी चर्चा गावात सुरु होती. गावात वेगळेच चित्र लोकांना पाहायला मिळाले. यामुळे अनधिकृत बांधकामास चाप बसणार असून अनधिकृत बांधकाम होऊ न देण्याचा विडा ग्रामस्थांनी उचलला आहे, असे यावरुन निदर्शनास येत आहे.