![]() |
File photo |
बेलापूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या समोरील वसाहतीमध्ये घरोघरी देशी, विदेशी हातभट्टी दारू बिनदिक्कतपणे खुलेआम विकली जात आहे. बेलापूर गावातील देशी दारूच्या दुकानांमधून अवैध दारू विक्री करणार्यांना देशी दारूच्या बाटल्यांचे खोकेच्या खोके ठोक स्वरूपात विकले जात आहे. त्याचप्रमाणे शाळेसमोरील छोट्या मोठ्या टपऱ्यांमधून बंदी असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू राजरोस खपवली जाते, हे कमी म्हणून की काय पत्त्यांचा क्लबही शाळेच्या रस्त्यात सुरू करण्यात आला आहे. याचे ना शाळा व्यवस्थापनाला सोयर-सुतक आहे ना स्थानिक पोलिस प्रशासनाला देणे घेणे!
नशा, व्यसन आणि जुगाराच्या या बाजारामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येणाऱ्या त्या बालमनासमोर नेमके कोणते धडे गिरवायचे हा प्रश्न नक्कीच उभा राहत असेल! शाळे समोरील रस्त्यावरून झिंगत चाललेले आणि रस्त्यावर पेंगत पडलेले नशेखोर तसेच तंबाखू, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारत उभे असलेल्या व्यसनी बहाद्दरांमध्ये आता जुगाऱ्यांचीही भर पडली आहे. हे सर्व बघून अनुकरणप्रिय असलेल्या या लहानग्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा संबंधित यंत्रणेने विचार करून शाळेसमोरील जुगार अड्डयासह सर्व अवैध धंदे त्वरित बंद करावेत अशी मागणी संतप्त पालक वर्गाकडून केली जात आहे.