श्रीरामपूर ( राजेश बोरुडे ) श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीत पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ९ डिसेंबर रोजी मोठा गाजावाजा करून कोट्यवधी रुपये खर्चाच्या विविध रस्त्यांच्या कामांच्या भूमिपूजनाचा समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी ठिकठिकाणी लावलेले फ्लेक्स बोर्ड, काही ठराविक वृत्तपत्रांना दिलेल्या लाखोंच्या जाहिराती हा सोपास्कार पार पाडण्यासाठी रक्ताचं पाणी करून कमविलेल्या गोरगरीब जनतेने विविध कररूपाने भरलेल्या पैशाची मोठी उधळपट्टी करण्यात आली. पालिका प्रशासनातील ठेकेदारधार्जिने अधिकारी व तत्कालीन सत्ताधारी यांच्या साक्षीने शहरात यापूर्वी झालेल्या निकृष्ट रस्त्यांवर पुन्हा रस्ते करण्याचा घाट घालून कोट्यवधी रुपये खर्चाच्या रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली आहेत. या आधी निकृष्ट कामे करून शहराचं वाटोळं करणारे ठेकेदार व दोषी अधिकारी आत्ताही पुन्हा दर्जाहीन कामे करून श्रीरामपुरकरांच्या कष्टाच्या, घामाच्या पैशाने स्वतःचे घर भरत आहेत. दरम्यान, श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीत कोट्यवधी रुपये खर्चून होत असलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामात 'नक्षत्र कन्स्ट्रक्शन कंपनी'कडुन सुरुवातीपासूनच अत्यंत निकृष्ट मटेरियलचा वापर होत असल्याने 'नक्षत्र कन्स्ट्रक्शन कंपनी' करत असलेल्या रासकर नगर मधील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासह इतर सर्व कामांचे कार्यारंभ आदेश त्वरित रद्द करण्याची तक्रार राजेश बोरुडे यांनी जिल्हाधिकारी, प्रशासक व मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
दीपावली निमित्त काही वर्तमानपत्रांना हाप पेजच्या पेज लाखों रुपयांच्या जाहिराती देणाऱ्या पालिका प्रशासनाने शहरात निकृष्ट रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून कायदेशीर कारवाई करावी, असेही राजेश बोरुडे यांनी म्हंटले आहे.
रासकर नगर येथील रस्त्याच्या कामात 'नक्षत्र कन्स्ट्रक्शन कंपनी'कडुन सुरुवातीपासूनच अत्यंत निकृष्ट मटेरियलचा वापर चालू केल्याने जनतेचे कोट्यवधी रुपये ठेकेदाराच्या घशात जाऊन केवळ ठेकेदाराचे घर भरले जाणार आहे. रासकर नगर मध्ये सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात सुरुवातीलाच अत्यंत निकृष्ट, कच्ची, लालसर व्हाईट स्पोटेड खडीचा वापर केला जात आहे. रस्त्याच्या कामात काळीशार, पक्क्या खडीचा वापर होणे आवश्यक असताना अत्यंत निकृष्ट मटेरियल वापर करून कामात अनियमितता ठेऊन मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरु आहे. रस्त्यांच्या कामाची दक्षता व गुण नियंत्रण पथकामार्फत चौकशी करावी. जनतेसह शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराचे प्रभाग क्र.१५ मध्ये रासकर नगर मधील रस्ते डांबरीकरण करणे (३० लक्ष), प्रभाग क्र.६ मध्ये चौधरी वस्ती अंतर्गत रस्ते काँक्रिटिकरण करणे (२५ लक्ष), प्रभाग क्र.१६ मध्ये बेलापूर रोड येथील विशाखा जनरल स्टोअर्स पासून पूर्वीकडे नाल्यापावेतेचा पूर्व-पश्चिम रस्ता डांबरीकरण करणे (१३ लक्ष), प्रभाग १३ मधील दहावा ओटा परिसरातील रस्ते काँक्रिटिकरण करणे (२० लक्ष) या व इतर कामांचे कामांचे कार्यारंभ आदेश तात्काळ रद्द करावे व सक्षम ठेकेदारास कामे देण्यात यावे, असे तक्रारीत म्हंटले आहे.
मटेरियल टेस्टिंग केले का नाही ?
करारनाम्यातील अटीनुसार रस्त्याचे काम सुरु करण्यापूर्वी रस्त्याच्या कामात वापर होणाऱ्या साहित्त्याची गुणवत्ता चाचणी होणे आवश्यक आहे, असे असताना ठेकेदाराने रस्त्याच्या कामात निकृष्ट मटेरियलचा वापर कसा सुरु केला? मटेरियलची टेस्टिंग केली का नाही? केली असेल तर टेस्टिंगला कोणते मटेरियल दिले व प्रत्यक्षात कोणते वापरले? असे अनेक सवाल राजेश बोरुडे यांनी उपस्थित करून पालिका प्रशासनाने त्यावर काय कारवाई केली याचा खुलासा करण्याची मागणी केली. तक्रारीचे निरसन झाल्याशिवाय ठेकेदाराला कोणतेही बिले देऊ नये, असे बोरुडे यांनी तक्रारीत म्हंटले आहे.
पालिका प्रशासन करारनामे कशासाठी करते??
करारनाम्यातील अटी-शर्ती प्रमाणे रस्त्याच्या कामातील खराब, निकृष्ट दर्जाचे मटेरियल तात्काळ काढून दर्जेदार, अंदाजपत्रकाप्रमाणे चांगले साहित्य वापरून रस्त्याचे कामे करावी. पालिका प्रशासन करारनामे कशासाठी करते? आजपर्यंत कोणत्या कामावरील खराब मटेरियल काढले? असा प्रश्न बोरुडे यांनी केला आहे.
रस्त्यांच्या कामाचा नामफलक लावला नाही
ठेकेदाराने करारनाम्यातील अटीप्रमाणे कामाच्या ठिकाणी विहित कामाचा माहितीदर्शक नामफलक लावलेला नाही. नामफलक नसल्यामुळे कमी कधी सुरु झाले. त्याचा दोषनिवारण कालावधी किती. कामाच्या तक्रारीचे निरसन कसे, कोण करणार आदी माहिती जनतेला समजूच नये. कामातील भ्रष्टाचार लपविण्यासाठीच ठेकेदार सर्व नियमांचे उल्लंघन करत आहे.
यापूर्वीही 'नक्षत्र कन्स्ट्रक्शन कंपनी'ने शहरात निकृष्ट कामे केलेली आहेत. 'नक्षत्र कन्स्ट्रक्शन कंपनी'ने केलेला कोट्यवधी रुपये खर्चाच्या गोंधवणी रस्त्याबाबत पालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या रस्त्याच्या कामात सदर ठेकेदाराने मोठी अनियमितता ठेऊन मोठा भ्रष्टाचार केल्यामुळे जनतेने त्याच्या तक्रारी केल्या त्याच्या सखोल चौकशी झाली पाहिजे तसेच 'नक्षत्र कन्स्ट्रक्शन कंपनी'ने केलेला लक्ष्मी टॉकीज रस्ता, दळवी वस्ती रस्ता, लोढा-गदिया मळ्यातील रस्ते, महाविद्यालय रस्ता, कांदा मार्केट परिसरात, कौशल्या नगर मधील रस्ते, साठवण तलाव लागत गोराने वस्ती लगतचा रस्ता. फातेमा हौसिंग सोसायटीतील रस्ते, मौलाना आझाद चौक ते नेहरू नगर पर्यंतचा रस्ता, बनकर हॉस्पिटल परिसरातील रस्ते, बोरावके नगर मधील अंतर्गत रस्ते, मोर्गे वस्ती परिसरातील रस्ते, पंजाबी कॉलनीतील गुरुद्वारा समोरील समोर रस्ता या व इतर अनेक रस्त्यांच्या कामात निकृष्ट खडी, मतिमिश्रित मुरूम वापरला. डांबर व खडी अतिशय कमी वापरल्याने रस्ते लागलीच उखडले. 'नक्षत्र कंपनी'ने केलेल्या निकृष्ट कामांविरोधात पालिका प्रशासनाकडे अनेक पक्ष, संघटना, नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या परंतु, पालिका प्रशासनाने ठेकेदारावर कारवाई न करता त्याला पाठीशी घातले. या सर्व कामांची सखोल चौकशी करून 'नक्षत्र कन्स्ट्रक्शन कंपनी'सह दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राजेश बोरुडे यांनी केली आहे.