दिनांक १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान मिलेनियम नॅशनल स्कूल येथे १५ सदस्य मुलींचा पुणे विभागीय व्हॉलीबॉल संघाचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. अहमदनगर जिल्ह्यातील दाढ येथे संपन्न झालेल्या विभागीय निवड चाचणी स्पर्धेतून या संभाव्य १५ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी संघातील खेळाडूंना मिलेनियम नॅशनल स्कूलचे संचालक अन्वित फाटक व नेहा फाटक आदींच्या हस्ते खेळाची जर्सी प्रदान करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना फाटक म्हणले की युवा मुलींनी या सर्व शिबिरासाठी आलेल्या मुलींचा खेळ बघून आपण देखील या खेळामध्ये प्राविण्य मिळवावे जेणेकरून आपल्या राज्याचा संघ बलाढ्य होईल व तो राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निश्चित पदक मिळवेल. मला आशा आहे की चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जाणारा पुणे विभागीय मुलींचा संघ निश्चित सुवर्णपदकास गवसणी घालेल यात शंकाच नाही असे ते पुढे म्हणाले.
या प्रसंगी मिलेनियम नॅशनल स्कुलचे क्रीडा अधिकारी रामदास लेकावळे यांनीही संघास शुभेच्छा दिल्या, राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप कोंडे, सचिन चव्हाण, पंकज शिंदे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन महेश गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप कोंडे यांनी केले.