श्रीरामपूर : शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामात संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केला. काही ठिकाणी सिंगल लेयर कार्पेट करून रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा आरोप भीम गर्जना संघटनेचे संस्थापक फिरोजभाई पठाण यांनी केला असून, निकृष्ट कामे करणारे ठेकेदार व अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अन्यथा भीम गर्जना संघनटनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, शहरातील बाजारतळाजवळील अटल बिहारी वाजपेयी आयलँड विकसित करण्याच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर चौकशी होऊन कठोर कारवाई करावी. शहरातील रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामात संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे निदर्शनात आले आहे. रस्त्यांचे कामे निविदेप्रमाणे केलेले नाहीत. कार्पेट, थिकनेसची जाडी निविदेप्रमाणे न करता केवळ कार्पेट करण्यात आल्याचे भासविण्यात आले. अटल बिहारी वाजपेयी आयलँड विकसित करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काही महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून रस्ते नादुरुस्त झाले. रस्त्यावर आजरोजी डांबर असल्याचे दिसून येत नाही. यावरून कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे सिद्ध होते. काँक्रीटीकरण व डांबरीकरणाचे रस्ते नादुरुस्त अवस्थेत आहेत. संबंधित अधिकाऱ्याने व ठेकेदाराने कामे करताना काही ठिकाणी किरकोळ कामे करून तर काही ठिकाणी कामे न करता मागील कामाचा उल्लेख करून कामे नवीन केल्याचे भासविले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.