- इफ्फी म्हणजे चित्रपट निर्मात्यांसाठी त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याचे आणि चित्रपटांची विक्री करण्याची संधी आहे : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख
गोवा/मुंबई, 27 नोव्हेंबर 2022
“प्यार दिवाना होता है, मस्ताना होता है
हर ख़ुशी से हर गम से, बेगाना होता है”
किशोर कुमारचा स्वर्गीय स्वर आणि राजेश खन्नाची सुडौल आकृती पणजीच्या मॅक्विनेझ पॅलेस सभागारातील पडद्यावर उमटताना, सोबतीला हे सदाबहार गीत ऐकल्यानंतर तेथील चित्रपट रसिकांसाठी हा क्षण मंत्रमुग्ध करणारा ठरला. या गाण्यात दिसणाऱ्या तसेच या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि रसिकांच्या दिलाची धड्कन असलेल्या आशा पारेख यांच्यासाठी तर हा क्षण भूतकाळातील आठवणींच्या देशात फिरवून आणणारा ठरला.
गोवा येथे सुरु असलेल्या 53 व्या इफ्फीमध्ये म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जेव्हा दादासाहेब फाळके पारितोषिकासाठी रेट्रो विभागात ‘कटी पतंग’ या सदाबहार चित्रपटाचे सादरीकरण झाले त्यावेळी आशा पारेख देखील उपस्थित होत्या. यावर्षीच्या इफ्फीमधील हा रेट्रो विभाग, ज्येष्ठ अभिनेत्री आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या आशा पारेख यांच्याप्रती समर्पित आहे.
चित्रपटाचे सादरीकरण तसेच महोत्सवाच्या प्रतिनिधींशी संवाद या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत, आशा पारेख म्हणाल्या की वर्षानुवर्षे इफ्फी हा महोत्सव अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. हा महोत्सव चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट सादर करण्याची तसेच त्यांची विक्री करण्याची संधी उपलब्ध करून देतो. इफ्फीच्या निमित्ताने संपूर्ण देशातील लोक एकत्र येत असल्याने हा महोत्सव म्हणजे सिनेप्रेमींसाठी भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण ठरले आहे असे त्यांनी सांगितले. आज करण्यात आलेल्या सन्मानाबद्दल, आशा पारेख यांनी इफ्फी, एनएफडीसी तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे आभार मानले.
अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकत असल्याने आशा पारेख यांना रसिकांकडून 60 आणि 70च्या दशकातील ‘हिट गर्ल’चा किताब मिळाला होता. बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत कारकीर्द सुरु केल्यानंतर, आशा पारेख यांनी 1959 सालच्या ‘दिल देके देखो’ या चित्रपटातून मुख्य अभिनेत्रीच्या रूपाने पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे आशा पारेख यांना मोठी प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी लाभली. त्यानंतर त्यांनी 95 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. य काळात त्यांनी सर्वोत्तम चित्रपट निर्माते आणि आघाडीच्या सर्व नायाकांसोबत काम केले. यात शक्ती सामंता, राज खोसला, नासीर हुसेन, राजेश खन्ना, धर्मेंद्र, शम्मी कपूर, मनोज कुमार देव आनंद आणि इतर अनेक बड्याबड्या व्यक्तीमत्वांसोबत काम केले. आशा पारेख यांना 1971 साली कटी पतंग या चित्रपटासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्तम अभिनेत्री या पुरस्काराने गौरविण्यात आले तर वर्ष 2002 मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांशिवाय इतर अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आशा पारेख या दिग्दर्शक, निर्माता देखील आहेत तसेच त्या ख्यातनाम भारतीय शास्त्रीय नर्तिका देखील आहेत.
वर्ष 1992 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविले. वर्ष 1998 ते 2001 या कालावधीत त्यांनी चित्रपट प्रमाणीकरण सेन्सॉर मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे हाताळली.
शक्ती सामंता यांचे दिग्दर्शन लाभलेला ‘कटी पतंग’ हा चित्रपट गुलशन नंदा यांच्या याच नावाच्या गाजलेल्या कादंबरी वर बेतला आहे. चित्रपटातील मुख्य पात्र माधवी (आशा पारेख) कमल(राजेश खन्ना)याच्याशी लग्न लागण्याच्या दिवशी घरातून पळून जाते.मात्र, प्रियकर कैलाश (प्रेम चोप्रा) याचा खरा चेहेरा दिसल्यावर तिचे आयुष्य दोर कापलेल्या पतंगासारखी होऊन जाते. परिस्थितीवश तिला एका घरात विधवा सून म्हणून आश्रय घ्यावा लागतो. त्या कुटुंबातील खरी सून पूनम (नाझ)रेल्वे अपघातात जबर जखमी होते आणि प्राण सोडण्यापूर्वी तिच्या मुलाची जबाबदारी माधवीकडे सोपवून जाते. माधवी नंतर आपल्या खोट्या नावासह आणि ओळखीसह चित्रपटात वावरते. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार राजेश खन्ना आणि संगीतकार आर.डी.बर्मन यांना एकत्र आणले.या चित्रपटामध्ये “ये शाम मस्तानी” “प्यार दिवाना होता है” आणि ''ये जो मोहोब्बत है”यांसारखी प्रचंड गाजलेली सदाबहार श्रवणीय गीते आहेत.