सोयाबिन साठवणूक करतांना पुढीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे. वाळलेले व स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्यूट बारदानामध्ये भरावे. पोत्यामध्ये साधारणपणे ६० किलोपर्यंत बियाणे साठवावे. त्यापेक्षा अधिक बियाणे साठवणूक करण्यात येऊ नये. जेणेकरून बियाण्याची वाहतूक करतांना हाताळणी योग्य प्रकारे होऊन बियाण्यास इजा होणार नाही. बियाणे घरी साठवणूक करतेवेळी सोयाबीन बियाण्याची थप्पी ७ फुटापेक्षा उंच जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बियाणे साठवणूक ही दमट व ओलसर जागेच्या ठिकाणी करू नये.
बियाणे साठवणूक करण्यापूर्वी जमिनीवर तट्टे किंवा लाकडी फळ्या किंवा जुने पोते अंथरून त्यावर बियाण्याची साठवण करावी. बियाण्याचे पोते सिलिंग करण्यापूर्वी बियाण्याची प्रत चांगली असल्याची खात्री करून घ्यावी. प्रत्येक पोते तपासणी करून ज्या पोत्यामध्ये काडीकचरा, दगडमाती, काळपट व ओलसर बियाणे आढळून आल्यास त्या पोत्याचे सिलिंग करू नये. शेतकऱ्यांना स्वत:कडील पेरणी योग्य सोयाबीनची ३ वेळा उगवणक्षमता चाचणी करूनच पेरणी करावी. उगवणक्षमता डिसेंबर व जानेवारी मध्ये साठवणूकी दरम्यान व बिजप्रक्रिया दरम्यान, मार्च महिन्यात विक्री दरम्यान, मे व जून मध्ये प्रत्यक्ष पेरणीपूर्वी करावी.
बियाणे साठवणूक करण्यात येत असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी गळणार नाही याची खात्री करूनच बियाण्याची साठवण करावी. तसेच अवकाळी येणाऱ्या वादळी पावसापासून बियाणे खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी. बियाणे व खते यांची एकाच ठिकाणी साठवणूक करू नये. सोयाबीन बियाण्याचे कवच नाजूक असल्यामुळे त्याची कमीत कमी हाताळणी करण्यात यावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी कळविले आहे.