नाऊर : श्रीरामपुर तालुक्यातील रामपुर ( कोकरे ) येथे गावालगत असलेल्या भडांगे यांच्या वस्तीवरील संजय त्रिंबक भडांगे गट नं. १८ मध्ये भर दुपारी ३ च्या सुमारास ऊसातुन आलेल्या बिबटयाने घरासमोर असलेल्या शेळीला ( बकरीला ) अचानक उचलुन घेऊन ऊसात जात असतांनाच संजय भडांगे यांच्या पत्नीने आरडाओरड केल्यानंतर भडांगे परिवारातील सदस्यांनी घराबाहेर येऊन फटाके फोडले असता बिबटयाने तोंडात धरलेल्या शेळीला तिथेच सोडून ऊसात पळ काढला. या बिबटयाबरोबर आणखी एक बिबटयादेखील असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले असुन या दोन्ही बिबटयांना त्वरीत जेरबंद करण्याची मागणी परिसरातुन होत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून गोदावरी पट्ट्यातील नाऊर, रामपूर, सराला -गोवर्धन, सावखेड गंगा आदी परिसरात बिबटयाचा सातत्याने वावर सुरू असून यापूर्वी नाऊर येथील शरद शिंदे यांच्या गाईचा देखील फडशा पाडला होता. त्यावेळी वनविभागाने कुठल्या प्रकारची दखल घेतली नव्हती. त्यानंतर शिंदे वस्ती परिसरात रहिवाशी असलेल्या अनेकांना बिबट्याचे कायम दर्शन होत होते, या भागातील नागरिकांनी पिंजऱ्याची मागणी केली असता पिंजरा लावण्यात आला होता. मात्र बिबट्या त्या पिंजऱ्यात अडकला नव्हता. यानंतर आता पुन्हा रामपूर शिवारामध्ये बिबट्याने पहिल्या दिवशी गणेश खेमनर यांच्या गट नंबर 9 मध्ये त्यांच्यासमोर समोरून कुत्र्याला ओढून नेले तर तिथेच राहत असलेले अमोल गहिरे यांच्या देखील वस्तीवरचा कुत्रा बिबट्याने ओढून नेला होता. या परिसरात दोन बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक शेतकऱ्यांना कधी बाभळीच्या तर कधी लिंबाच्या झाडावर देखील दर्शन झालेले आहे. त्यामुळे या परिसरात वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
दरम्यान, सध्या झालेल्या अति पाऊसामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असुन दिवाळीमुळे कसं बसं शेतात उरलेले सोयाबिन सोंगणीसह कपाशी वेचण्याचे काम सुरू असुन बिबटयाच्या दहशतीमुळे मजुरी काम करणाऱ्या पुरुषासह महिला शेतामध्ये जाण्यास धजावत नसल्याने बिबट्यामुळे शेती व्यवसाय देखील संकटात सापडला आहे.