यावेळी बोलताना स्नेहल खोरे म्हणाल्या की, बेलापूर रोड, लबडे वस्ती, थत्ते मैदान, मुळा-प्रवरा, गौतमनगर, पूर्णवादनगर परिसरात गेल्या काही वर्षांपासून अंगणवाडी सुरू करावी म्हणून नागरिकांची मागणी होती. मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या माध्यमातून अंगणवाडी सुरू केली. अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या इमारतीत ही अंगणवाडी सुरू झाल्याने मोरया फाउंडेशन, इनर व्हील क्लब यांच्या मदतीने रंगकाम, अंतर्गत सजावट व बाह्य सजावट करण्यात आली. तर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तात्काळ पेव्हर ब्लॉक व खिडक्यांची दुरुस्ती करून दिल्याने अंगणवाडीत येणारे बालक व पालक दोघांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण झाले आहे. यापूर्वी शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी पालकांना मोरगे वस्ती किंवा सरस्वती कॉलनी येथील अंगणवाडीमध्ये बालकांना घेऊन जावे लागत होते. मात्र पूर्णवादनगरच्या अंगणवाडीमुळे हा त्रास संपल्याचे खोरे म्हणाल्या.
यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रिया शहा यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीच्या बालकांना खेळण्यांचे वाटप करण्यात आले. तर अंगणवाडीच्या सजावटीबद्दल परिसरातील महिलांनी स्नेहल खोरे यांचा सत्कार केला. यावेळी अंगणवाडी सेविका लता गायकवाड, पुष्पा आहेर, सुरेखा पाटील, होले मावशी, कोकंदे आजी, वैशाली शेलार, पुष्पा दिवे, ज्योती सोनवणे यांच्यासह परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.