श्रीरामपूर : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आपल्या विचार, कार्यामुळे व साहित्य संपदेमुळे जगात पोहचले, पण स्वतःच्याच देशात, राज्यात, गल्लीत आजही खऱ्या अर्थाने ते पोहचले नाहीत, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी व्यक्त केली.
अनुगामी लोकराज्य अभियान (अनुलोम) सामाजिक संस्थेच्या वतीने श्रीरामपूर येथील सिद्धार्थनगरमध्ये आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अभिवादन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करण्यात आले. अनुलोमच्या श्रीरामपूर तालुका जनसेविका सुनंदा आदिक अध्यक्षस्थानी होत्या. सामाजिक कार्यकर्ते बंडुकुमार शिंदे, परशुराम आदिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अमोल मिसाळ यांची वस्ती जनसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी साळवे म्हणाले, १४ सप्टेंबर १९६१ रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे ४० दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले होते. तसेच भारत-रशिया संबंधाना ७५ वर्ष होत आहेत. या घटनेचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने रशियाची राजधानी मॉस्को येथे मुंबई विद्यापीठ व मॉस्कोतील विदेश भाषा ग्रंथालयाच्या वतीने अण्णा भाऊ यांचा पुतळा व तैलचित्राचा अनावरण सोहळा पार पडला. यानिमित्त "अनुलोम"च्या वतीने या अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अण्णा भाऊ यांचे २०२० मध्ये जन्म शताब्दी वर्ष होते. पण तत्कालीन सरकारने ही जन्म शताब्दी साजरी केली नाही. सत्ता बदलानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जन्म शताब्दी साजरी करण्याचे जाहीर केले आहे. या माध्यमातून अण्णा भाऊ यांचे साहित्य, विचार व कार्य पोहचविण्याचे काम सरकारसोबतच तरूण व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. प्रारंभी साम्यवादी असणारे अण्णा भाऊ नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार-कार्याने प्रेरित होऊन आंबेडकरवादी झाले. त्यांनी बाबासाहेबांनाच प्रेरणास्थान मानले. त्यामुळेच " जग बदल घालुनी घाव...मज सांगून गेले भीमराव" अशी काव्यरचना त्यांच्या अंतःकरणातून प्रकटली. दीनदलित, कष्टकरी, वंचित, उपेक्षितांचे ते महानायक, एक समाज अभियंता होते, असेही मिलिंदकुमार साळवे याप्रसंगी म्हणाले.
अनुलोमच्या जनसेविका सुनंदा आदिक यांनी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही उपस्थितांना दिली. शिंदे अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या माडया बांधल्या नाहीत. पण मोठमोठ्या माडया,इमारतींमध्ये त्यांची छायाचित्रे आहेत, असे सांगितले. परशुराम आदिक यांनी सरकारी योजनांबाबत मार्गदर्शन केले. प्रशांत मोरे यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धार्थनगर युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब मिसाळ यांनी आभार मानले.
याप्रसंगी सचिन खंडागळे, संजय आंग्रे, विशाल खंडागळे, अमोलकुमार मिसाळ, आकाश पंडित, मुशरफ शेख, सोमनाथ रोकडे, दीपक बिरंजे, अमित चांदेकर, करण खंदारे, मुकेश शिंदे, रमेश शिंदे, शाम मगर, चेतन जोजाळ, जयंत आंग्रे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.