प्रधान मंत्री क्षयमुक्त भारत अभियान, निक्षय मित्र सत्कार समारंभ आणि पोषण आहार वितरण सोहळा आज झाला. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी एन, राजभवनचे प्रधान सचिव डॉ. संतोष कुमार , सहसंचालक डॉ. रामजी आडकीकर आदी उपस्थित होते.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले की, भारतातून सन 2025 पर्यंत क्षय रोगाला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. यासाठी प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी व्हायचे असेल तर या अभियानात लोकांनी सहभागी झाले पाहिजे.
वेळीच उपचार घेतले तर क्षयरोग बरा होऊ शकतो. मात्र त्यासाठी वेळीच तपासणी केली पाहिजे आणि वेळेत उपचार घेतले पाहिजेत. याबाबत नागरिकांच्यात जागृती करायला हवी. यामध्ये स्वयंसेवी संस्था, शासकीय संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी अधिकार्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, या अभियानात शैक्षणिक संस्था, औद्योगिक कंपनी, सामाजिक संस्था यांचाही सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
जगातील सर्वात जास्त क्षयरुग्ण भारतात आहेत. दरवर्षी सुमारे पाच लाख नागरिक क्षय रोगाने मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. भारतातून 2025 पर्यंत क्षयरोगाला हद्दपार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हे उद्देश साध्य करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे, असे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते निक्षय मित्रांचा सत्कार करण्यात आला. तसेच पोषण आहार पोटलीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली गोमारे यांनी आभार मानले.