सरदार पटेलांच्या निजामावरील पोलीस ॲक्शनप्रमाणेच प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांची काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिम्मत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हैद्राबादच्या परेड ग्राऊंडवर शिवरायांचा जयघोष; महाराष्ट्राच्या ढोल ताशांनी परेडमध्ये मने जिंकली


मुंबई, दि १८ : काश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हैदराबाद मुक्ती संग्रामानिमित्त काल हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांनी दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी मधून आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, त्यावेळी येथील परेड ग्राऊंडवर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

काल सकाळी औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री हैद्राबाद येथे पोहोचले आणि त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी आयोजित केलेल्या हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिस्तबद्ध, आकर्षक परेड

प्रारंभी महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक अशा तीनही राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी दर्शकांची मने जिंकून घेतली. विशेषतः महाराष्ट्राच्या ढोल ताशाच्या पथकांनी तर वातावरणात चैतन्य निर्माण केले. यावेळी आदिलाबादच्या पथकांनी लांबाडी तसेच गुसाडी, चिडूतालु, कोलाटम ही नृत्ये सादर केली. कर्नाटक पथकाने डोला कुनिथा बँड वाजविला. परेडमध्ये लष्कराच्या दलांनी, एनसीसी विद्यार्थ्यांनी देखील संचलन केलं आणि वाहवा मिळविली.

1948 मध्ये निजामाच्या विरुद्ध पोलीस ॲक्शन द्वारे कारवाई करत तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानाला स्वतंत्र करून देशात विलीन केले हा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत दाखविली आहे.

मुख्यमंत्री आपल्या छोटेखानी भाषणात म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यावर माझा पहिला कार्यक्रम होता देशव्यापी हर घर तिरंगा मोहीम. राज्यातल्या अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकावून आम्ही ही मोहीम यशस्वी करून दाखवली.  आज देशात पहिल्या प्रथमच केंद्र सरकारने हैदराबाद राज्याचा मुक्तिसंग्राम कार्यक्रम सुरू करून, हा मुक्ती संग्राम नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा मोठा प्रयत्न केला आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेला लढा आजही आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हैदराबाद मुक्तिसंग्राम हा निजामासारख्या क्रूर शासकापासून मुक्ती मिळवण्याचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना नमन करण्याचा आहे, असेही मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post