विधवा नका, आम्हाला एकल म्हणा, श्रीरामपुरात कोरोना एकल महिलांनी केली मानाच्या 'श्री' ची आरती


श्रीरामपूर : "कोरोनाच्या पहिल्या लाटेत माझे सासरे, नंतर पती, तर दुसऱ्या लाटेत मी वडील गमावले. कोरोनामुळे आमच्या कुटुंबावर काय संकट आले? आमचे काय हाल झाले? हे आमचे आम्हालाच माहीत !  आता आम्ही कुठे त्यातून सावरत आहोत. अजूनही आमच्या मनाच्या जखमा भरलेल्या नाहीत. पण समाजाला हात जोडून एकच सांगणे आहे, आम्हाला विधवा म्हणू नका, तर एकल महिला म्हणा. विधवा म्हटले की मनाला प्रचंड वेदना होतात." कधीही हाती माईक न घेतलेल्या संगीता संदीप कुरूंद या कोरोना एकल महिला भगिनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून देत होत्या.


         निमित्त होतं श्रीरामपूर ( जि. अहमदनगर) येथील  सर्वात जुन्या अशा आझाद मैदानातील  मानाच्या ७२ वर्षांच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी  श्रीरामपूर शहर व तालुक्यातील कोरोना एकल महिलांना समाजात मान-सन्मान मिळावा, दुःखाचे विस्मरण व्हावे, या हेतुने गणेशोत्सवानिमित्त "श्री" च्या आरतीचा मान देण्यात आला, याप्रसंगीचं.  कविता अशोक परभणे, दुर्गा राजेंद्र नाटकर,  शालिनी बाळासाहेब ससाणे, भूमिका आशिष बागुल, सुनंदा बागुल, कावेरी पवार, वंदना संतोष काळे, चैत्राली प्रशांत गवारे, अरुणा राजू शेळके, माया जाधव, वेरूणिका गायकवाड, ज्योती क्षिरसागर, सविता क्षिरसागर या कोरोना एकल महिलांसह कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या जिल्हा समन्वयक मनिषा कोकाटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका हेमलता कुदळ, अनुराधा डोखे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.  सुनील साठे, चंद्रकांत परदेशी, मनोजकुमार नवले यांच्या पुढाकाराने हा पथदर्शी उपक्रम पार पडला. या महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मानाच्या सार्वजनिक गणेश मंडळाने कोरोना एकल महिलांना आरतीचा मान देऊन त्यांचा बहुमान केल्याबद्दल आभार मानताना संगिता कुरूंद यांनी प्रातिनिधिक कोरोना एकल महिलांचे दुःख मांडतांना दोनच ओळीत भावनांना मोकळी वाट करून दिली. पण उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.

            कोरोनामुळे होरपळलेल्या या महिलांचे प्रश्न, अडचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून ते सोडविण्यासाठी तसेच स्वतंत्र धोरण, योजना आखण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी यावेळी सांगितले. तर परशुराम आदिक म्हणाले की, या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनुलोमच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल.

      मंडळाचे पदाधिकारी मनोजकुमार नवले यांनी सूत्रसंचालन केले. सुनील साठे यांनी आभार मानले. कोरोना एकल महिलांसाठी करीत असलेल्या कार्याबद्दल मिलिंदकुमार साळवे, मनिषा कोकाटे, बाळासाहेब जपे यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. 

       कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, चंद्रकांत परदेशी, सुनील साठे, मनोजकुमार नवले,अनिल छाबडा, वैभव  सुरडकर, कुणाल कारंडे, इसाक पटेल, राजू बोरुडे, सोमनाथ परदेशी, किशोर फाजगे, सुनील शेळके, दादा सुरडकर, सूर्यकांत संगम, अरुण गांधी ,अरविंद डोखे,  आदींनी परिश्रम घेतले.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post