श्रीरामपूर : स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था,श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आदर्श शिक्षकांसह सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्यांच्या सन्मानासाठी शिक्षक दिनी विविध राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा पुरस्काराने सन्मान केला जाणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी दिली.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील संत तेरेजा गर्ल्स हायस्कूलचे क्रीडाशिक्षक श्री नितीन बलराज यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील १० ते १२ वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी विविध स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी केली आहे.
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे चित्रकला शिक्षक श्री दौलतराव पवार यांना कला क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव कामगिरीबद्दल राज्यस्तरीय कला भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर खंडाळाचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य श्री दिनकर सदाफळ यांना सामाजिक क्षेत्रातल्या भरीव कामगिरीबद्दल समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.