अहमदनगर ( श्रीरामपूर ) : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सध्या ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत, यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाने ७५ वर्षांवरील सर्वच ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.बसेस मधून मोफत प्रवास चालू केला, त्याप्रमाणेच महाराष्ट्रात जितकी विविध धार्मिक स्थळे आहेत त्यांनादेखील विजेचे पुरवठा हा कायमस्वरुपी मोफत करण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
आपल्या देशात विविध जाती-धर्माचे लोकं हे मोठ्या गुण्या-गोविंदाने राहतात. सर्वच धर्मिय आपापल्या धर्मानुसार आपापल्या धार्मिकस्थळावर जाऊन प्रार्थना करतात.याकरीता सर्वच धार्मिक स्थळांना विजेचा मोफत पुरवठा करण्यात आल्यास सर्वधर्मिय भाविकभक्तांचा आनंद नक्कीच द्वगुणीत होऊन भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अधिकच जास्त आनंद वाटणार आहे. यानिमित्ताने सर्वच धार्मिक स्थळांना मोफत विज पुरवठा करणेकामी राज्य शासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन याविषयी ठोस भुमिका घेत तमाम सर्वधर्मिय भाविक भक्तांसाठी प्रत्येक धार्मिक स्थळांना मोफत वीज पुरवठा करत याठिकाणचा कायमचा विजेचा प्रश्न सोडवावा, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.