![]() |
खासदार संजय सिंग यांच्याशी 'आप'चे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी पालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. |
पुणे : नगर जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी त्यांना मूलभूत सेवा देण्यासाठी सर्व नगर परिषदेच्या निवडणुका आम आदमी पार्टी लढविणार असून, कार्यकर्त्यांनी दिल्ली व पंजाब मध्ये 'आप'ने केलेली कामे नागरिकांपर्यंत पोहचून निवडणूक प्रचाराच्या कामाला लागावे, असे आवाहन आम आदमी पक्षाची संसदेतील मुलुख मैदानी तोफ खासदार संजय सिंग यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांना केले.
आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांचा मेळावा पुणे येथे घेण्यात आला. या कार्यक्रमानंतर जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, दक्षिण जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, राहुल रणपिसे,भरत डेंगळे, दिनेश जाधव, प्रवीण जमदाडे यांनी खासदार संजय सिंग यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पार्टीच्या कामासंदर्भात माहिती दिली व संभाव्य नगरपरिषद निवडणुकीची जबाबदारी व स्टार प्रचारक म्हणून जिल्ह्याला वेळ द्यावा, अशी विनंती केली. जिल्ह्यात आम आदमी पार्टीचे कार्य चांगले आहे. सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नासाठी मोठमोठी आंदोलने करण्यात आली. विज बिल, रस्ते, आरोग्य, शिक्षण, याविषयी जनजागृती करून शासनाला निवेदने दिली.त्यामुळे पार्टीचे कार्य घरोघरी पोहोचले आहे. आम आदमी पार्टीचा सामान्य कार्यकर्त्यांमधून नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्याकरता जोमाने कामाला लागा. वेळ पडल्यास दिल्ली विधानसभेतील मंत्रिमंडळ प्रचारासाठी आणू. पार्टीचा कार्यकर्ता नगराध्यक्ष, नगरसेवक कसा होईल ते पाहू. याची काळजी करू नका. कामाला लागा, असा सल्लाही खासदार संजय सिंग यांनी याप्रसंगी दिला. यावेळी राज्य कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ही भेटी घेण्यात आल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी दिली.