(गौरव डेंगळे) |
२१ व्या आशियाई पुरुष अंडर २० व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत बलाढ्य इराणने भारताचा ३-१ असा पराभव करून अतुलनीय विक्रमासह आपले विजेतेपद यशस्वीपणे राखले.२५-१२,२५-१९,२२-२५, २५-१५ अशा विजयाने इराणने सलग दोनसह एकूण सात वेळा अजिंक्य ठरला. अंतिम सामन्यात पराभवानंतर देखील भारतीय संघ जागतिक व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप साठी पात्र ठरला आहे. भारताने २० वर्षात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे त्यांना अभिमान वाटावा अशी कामगिरी संघाने केली आहे.
भारतीय व्हॉलीबॉल संघाने १९९४ मध्ये दोहा,कतार येथे प्रथम अंतिम फेरी गाठली, त्यानंतर कोरिया येथे सन २००२ मध्ये भारतीयांनी पुन्हा अंतिम फेरी गाठली.यजमान इराणकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला आणि तेव्हापासून भारत कधीही अंतिम फेरीत पोहोचला नाही. त्यामुळे, या १७ संघांच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे लक्षात घेता, येथे त्यांचे तिसरे रौप्यपदक जिंकणे ही भारतासाठी अविश्वसनीय गोष्ट आहे.
स्पर्धेतील सर्वोत्तम मिडल ब्लॉकर म्हणून भारतीय संघाचा कर्णधार दुष्यंत सिंग याची निवड करण्यात आली तर सर्वोत्तम लीबेरो म्हणून भारताचा कार्तिकीयन याची निवड करण्यात आली. रौप्यपदक विजेत्या भारतीय व्हॉलीबॉल संघाचे व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष खा अच्युत समंथा,आशियाई व्हॉलीबॉल कोन फेडरेशनचे सदस्य रामअवतार सिंग जाखड, व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव अनिल चौधरी आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.