श्रीरामपूर : देश आता कोरोनाच्या महाभयंकर संकटातून हळू हळू बाहेर पडत आहे. कोरोना रुग्णांची संख्याही सर्वत्र घटत आहे आणि यामागे कोरोना कालावधीत कष्ट घेतलेले आरोग्यसेवक, अंगणवाडी ताई, आरोग्यसेविका, सफाई कामगार आणि सर्वच ज्ञात अज्ञात मंडळींचे यामध्ये मोलाचे कार्य असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केले. निमगाव खैरी, उंदिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीदरम्यान त्या बोलत होत्या.
आज अचानक सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी निमगाव खैरी, उंदिरगाव ,कुरणपूर बयेथील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्यांना भेटी दिल्या. याप्रसंगी निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रप्रमुख डॉ. धापटे व प्रा.आ.केंद्रातील सर्वच कर्मचारी उपस्थित होते. तसेच महिला बाल कल्याण च्या श्रीमती आशा लिप्टे व त्यांच्या सहकारी देखील उपस्थित होत्या. सभापतींनी अचानक दिलेल्या भेटीमुळे सर्वांची धावपळ उडाली होती. परंतु डॉ. वंदना मुरकुटे यांनी येथील दाखल रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली, सभापती स्वत: उपस्थित राहिल्या म्हणून येथील महिला रुग्णांना अत्यंत आनंद झाला व सर्व महिलांनी सभापतींशी मनमुराद संवाद केला.
वास्तल्य विकास योजनेंतर्गत नोंदी करून लवकरात लवकर लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, तसेच कोरोना ने मरण पावलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांना शासनाकडून मिळणारा लाभ लवकरात लवकर मिळवून द्यावा याबाबतही सूचना केल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रांनी दाखल रुग्णांकडे व विशेषत: गरोदर महिलांकडे जातीने लक्ष द्यावे, नुकत्याच देवळाली प्रवरा येथे घडलेल्या गरोदर महिलेचा प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन असे प्रकार टाळले जावेत याकडे लक्ष केंद्रीत करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आपल्याकडे औषधसाठा, तसेच आवश्यक यंत्रसामुग्री पुरेशा प्रमाणात आहे किंवा नाही याबाबत मासिक अहवाल तयार करुन सादर केला पाहिजे याबाबत सुचविण्यात आले. यानंतर निमगाव खैरी,कुरणपुर येथील अंगणवाडीला देखील भेट देण्यात आली. याप्रसंगी अंगणवाडी सेविकांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले, तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व आपल्या पाठीशी खंबीर उभी राहणार असल्याची ग्वाही देखील यावेळी सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी दिली. यावेळी येथील अंगणवाडी ताई मीराताई भागडे, सारीका ढोबळे, मंदा ढोबळे, अनिता काजळे, शेख ताई, पंडित ताई उपस्थित होत्या. तसेच याप्रमाणे उंदिरगाव येथील आरोग्य केंद्राचे डॉ. राजगुरू व तेथील आरोग्ये केंद्राचे सर्व आरोग्यसेवक उपस्थित होते. उंदीरगाव, हरेगाव येथील आदिवासी कुटुंबांची संख्या अधिक असून येथील वस्तीमधील लोक मोलमजुरी करून आपला उदारनिर्वाह चालवितात तरी त्यांना मोफत उपचारासाठी कुठल्याही अडचणी आल्या नाही पाहिजेत याबाबत दक्षता घ्यावी अशा सूचना केल्या. अंगणवाडी ताईनी आपल्याला देण्यात आलेले टार्गेट वेळेत पूर्ण करावे, घर ते घर जाऊन शासनामार्फत देण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांक मार्गदर्शनासाठी वापरण्यात यावा जेणेकरून योग्य माहिती मिळेल याबाबतहि सुचविले. हरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाड्यांना देखील सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी भेटी देऊन विचारपूस केली. याचबरोबरच कुरनपूर, फत्याबाद, गलनिंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाड्यांना देखील भेटी देण्यात आल्या.
महिला व बालकल्याण च्या प्रकल्प अधिकारी श्रीमती लीप्ते यांनी सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांचेसमोर सादर केला. सदरच्या भेटीदरम्यान दाखल रुग्ण महिला, बालक व इतर रुग्ण व अंगणवाडी ताईना मोठा दिलासा मिळाला व आपल्या अडीअडचणी व गावातील प्रमुख पदाधिकारण्यांनी समस्यांबाबत सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली.