'समाजवादी पार्टी'च्या उपोषणाला 'श्रीरामपूर'करांचा मोठा पाठिंबा ; अवैध धंदे बंद झालेच पाहिजे...! मटका, गुटखा, दारू, पत्ते, गुन्हेगारीमुळे श्रीरामपूर बदनाम


श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करूनही मटका, पत्याचे क्लब, गावठी दारु विक्री, सोरट   असे अनेक अवैध व्यवसाय पोलीस प्रशासनाच्या नाकावर टीच्चून सुरूच असल्याने ते बंद करावे, या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरील महात्मा गांधी चौकात २२ मार्चपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. जमादार यांच्या  उपोषणाला विविध पक्ष, संघटनांसह सर्वसामान्यांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे, श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त अनुराधा आदिक यांच्यासह अनेकांनी उपोषणस्थळी भेट दिली. छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख, 'साईकिरण टाइम्स'चे संस्थापक राजेश बोरुडे यांनी अवैध धंद्याविरोधातील उपोषणाला पाठिंबा देऊन अवैध धंदे बंद करण्यासाठी विविध पक्ष, संघटनाकडून वारंवार उपोषणे होत असताना पोलीस प्रशासन अवैध बंद का करत नाही?? असा सवाल उपस्थित केला.


              समाजवादी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना ३ मार्च २०२२ रोजी निवेदन पाठवून श्रीरामपूर शहरसह तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती. दरम्यान, निवेदन देऊनही खुलेआमपणे अवैध धंदे सुरूच असल्याने जामदार यांनी मंगळवारपासून ( दि.22) आमरण उपोषण सुरु केले. पत्याचे क्लब, गावठी दारु विक्री, मटका, सोरट, तीन पत्यांचा खेळ (तोता मैना), अनधिकृत ऑनलाईन लॉटरी (ऑनलाइन मटका ) अशी अवैध व्यावसाय खुलेआमपणे चालु आहे. यामुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून जुगारी व दारुच्या व्यसनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना देखील गुटखा तर सर्रासपणे काही दुकानात विकला जात असल्याचे दिसून येत आहे. श्रीरामपूर शहरासह तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसाय चालु असल्याने गुन्हेगारांची दहशत निर्माण झालेली आहे. सर्वसामान्य नागरीक दहशत आणि भीतीच्या सावटाखाली आपले जीवन जगत असल्याने जिल्हा पोलिस प्रमुख श्री मनोज पाटील यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालुन अवैध व्यावसाय बंद करुन जनसामान्यांना न्याय द्यावा, असे समाजवादी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी जिल्हा पोलिस प्रमुख यांना दिनांक ३ मार्च २०२२ रोजी पाठविलेल्या निवेदनात म्हटले होते.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post