साईकिरण टाइम्स | २४ जानेवारी २०२१
श्रीरामपूर नगरपारिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक एक मधील अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या गोंधवणी परिसरात वर्षानुवर्षांपूर्वी केलेल्या गटारींची पुरती 'वाट' लागल्याने नागरिकांना मार्गक्रमण करण्यासाठी 'वाट' राहिली नाही. तुटक्या-फुटक्या, तुंबलेल्या गटारींमधून रस्त्यावर मैलामिश्रित पाणी वाहू लागल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रभागातील नगरसेवकांसह, पालिका प्रशासनाचे या परिसरात दुर्लक्ष होत असून या भागाला कुणी 'वाली' आहे का नाही? असा सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे.
२० ते २५ वर्षांपासून येथील अंतर्गत रस्त्याचे काम झालेले नाही. गटारी तुंबल्या आहेत. रस्त्यावर गटारींचा मैला वाहू लागला आहे. गटारींची दुरुस्ती करून रस्त्याचे काम करण्यात यावे; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
- प्रविण कोल्हे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, छावा मराठा युवा संघटना.
पालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मधील गोंधवणी, मारुती मंदिर परिसरातील गटारींची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. गटारींचे पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. गटारींचा मैला रस्त्यावर येऊ लागला आहे. अनेक वर्षांपूर्वी केलेल्या गटारी नामशेष झाल्या आहेत. गटारींची दुरुस्ती केली जात नाही. नियमित साफसफाई केली जात नाही. प्रभागातील नगरसेवकांचे नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. पालिका प्रशासनाने या ठिकाणी त्वरित लक्ष घालून नागरिकांच्या समस्या दूर करणे आवश्यक आहे.