साईकिरण टाइम्स | १४ जानेवारी २०२१
श्रीरामपूर | श्रीरामपूर तलाठी कार्यालयातील खाजगी व्यक्तींकडून सर्वसामान्यांची होणारी लूट त्वरित थांबवून, तलाठी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. तेथील कर्मचाऱ्यांना शासकीय ओळखपत्र बाळगणे सक्तीचे करण्यात यावे, अशी तक्रार छावा स्वराज्य रक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच तहसीलदारांकडे केली असून, शासनाने तलाठी नागरिकांच्या सेवेसाठी बसवले आहे की त्रास देण्यासाठी?? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
याबाबत छावा स्वराज्य रक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रान भाई शेख, प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश भोसले, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष रॉकी लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष योगेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुदाम गायकवाड, नारायण देवाडिगा यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले कि, श्रीरामपूर, भैरवनाथ नगर तलाठी कार्यालयात जे सर्वसामान्य नागरिक शासकीय दाखले व जमिनीच्या नोंदी करण्यासाठी येतात. त्यांची या कार्यालयात तलाठ्यांनी नेमणूक केलेले खाजगी दलाल मोठ्या प्रमाणात लूट करतात. स्वतः तलाठी सुद्धा नागरिकांना या खासगी दलालांना भेटण्यास सांगतात. हे नेमके चालले तरी काय? शासनाने तलाठी हे नागरिकांच्या सेवेसाठी बसवले आहेत की त्रास देण्यासाठी?? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे. कोणत्याही सर्वसामान्य नागरिक आपल्या जमिनीच्या नोंदी लावण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला तर त्यांचे खाजगी दलाल गणेश नावाच्या व्यक्ती भेटण्यास सांगतात. नेमके गणेश नावाची व्यक्ती या कार्यालयात आहे तरी कोण? कोणत्या पदावर कार्यरत आहे? हे आम्हालाही कळविण्यात यावे. असेही निवेदनात म्हटले आहे.
तलाठी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. त्यांना मानसिक त्रास सुद्धा देण्यात येत आहे. शासनाने या गोष्टीवर गांभीर्यपूर्वक लक्ष घालून सर्वसामान्य या त्रासापासून मुक्त करावे. तलाठी कार्यालय मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित बसवावे. तेथील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे करावे. जेणेकरून तेथे येणाऱ्या नागरिकांना खाजगी दलालांपासून वाचण्यास मदत होईल. दहा दिवसाच्या आत तक्रारीचे निवारण झाले नाही तर श्रीरामपूर तहसील कार्यालयासमोर कोणतीही पूर्वसूचना न देता स्वराज्यरक्षक रक्षक सेनेच्या वतीने घंटानाद घंटानाद आंदोलन करण्यात येईल, सज्जड इशारा देण्यात आला आहे.