साईकिरण टाइम्स | ८ जानेवारी २०२१
श्रीरामपूर शहरासह तालुक्यात दुचाकी वाहन चोरीच्या घटना घडतच आहेत. पोलीस यंत्रणेने वाहन चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. नुकतेच (दि.६) शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय परिसरातून भरदिवसा दुचाकी वाहन चोरी गेल्याने पोलिसांचा चोरांना धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील नवनाथ गडाख (धंदा शेती रा.उक्कलगाव ता. श्रीरामपूर) हे व इतर दोघे जण गावातील नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी स्वयंवर मंगल कार्यालयात आले होते. त्यांची बजाज प्लटीना (एम. एच. १७ बी. एफ २२४७) ही दुचाकी मंगल कार्यालयाच्या आवारात लावलेली होती. गडाख हे लग्न समारंभाच्या कार्यक्रमात व्यस्त असताना अज्ञात चोरट्यांनी मंगल कार्यालयाच्या आवारात लावलेली दुचाकी लाॅक तोडून चोरुन नेली. लग्न समारंभ आटोपल्यानंतर नवनाथ गडाख हे घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना पार्किंगमध्ये आले असता स्वतःची गाडी पार्किंगमध्ये आढळून आली नाही. त्यांना गाडी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी इतरत्र श्रीरामपूर शहरात सर्वत्र चौकशी केली असता मिळून आलेली नाही. त्यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांशी संपर्क करुन दुचाकी चोरी झाल्याची कल्पना दिली. याबाबत रितसर तक्रार शहर पोलिसांना नवनाथ गडाख यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.