सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन मिळावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृति समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने श्रीरामपूर पंचायत समिती मधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प कार्यालयावर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलतांना युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके म्हणाले, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृति समितीतर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्ती नंतर दरमहा पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. सदर प्रस्तावानुसार पेन्शन योजना लागू करावी ही मागणी संघटनेने गेली अनेक वर्षापासून शासनाकडे केलेली आहे. शासनाने सकारात्मक आश्वासने देवूनही त्या बाबत अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर तालुका प्रकल्प स्तरावर आंदोलने केली जात आहे. सरकारने याबाबत निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा भविष्यात याही पेक्षा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी युनियनचे सहचिटणीस कॉ. जीवन सुरुडे, इंद्रायणी दुशिग, रतन गोरे, निर्मला चांदेकर यांची भाषणे झाली. मागण्याचे निवेदन प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री, महिला बालविकास मंत्री यांना देण्यात आले. यावेळी कॉ. श्रीकृष्ण बडाख, उषा अमोलिक, शांता तागड, शायरा शेख, अनिता परदेशी, पल्लवी फरगडे, प्रमिला सुलाखे, मीना गायके, ज्योती डहाळे, मीरा बोरगे, संगीता विधाटे, अंजली अमोलिक, मीरा भोसले, उषा वाणी, शोभा लोखंडे, कुसुम भापकर, अनिता नवरे, मंगल राऊत, पुष्पा तोरस्कर, मीना गायके, अरुणा डांगे, सविता पडोळे, मीरा भोसले, कमल दौंड आदिसह मोठयासंख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.