बेलापूर | प्रतिनिधी |सकाळी फिरत असताना बिबट्याने तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे बुधवारी (दि.६ ) घडली. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव पोकळे यांच्याशी 'साईकिरण टाइम्स'ने संपर्क करून पिंजरा लावण्याची मागणी केली असता वनरक्षकास घटनास्थळी पाठविले असल्याचे सांगितले.
याबाबत माहिती अशी की, नीरज पुजारी हे नेहमीप्रमाणे पहाटे व्यायामासाठी फिरत असताना मांगिरबाबा परिसरातील संजय गायकवाड यांच्या वस्ती समोर त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. नीरज पुजारी हे सावध असल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. त्यांच्यासह मागेपुढे फिरण्यास आलेले नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या तिथून पसार झाला. विशेष म्हणजे बिबट्याने नीरज पुजारी यांचेवर समोरुन हल्ला केला. त्यामुळे त्यांना त्वरित प्रतिकार करता आला. त्यांच्या शरीरावरती बिबट्याच्या नखांचे निशाण झाले असून त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. बेलापूर खुर्द गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला असून वन अधिकाऱ्यांनी या भागात त्वरित बिबट्या धरण्यासाठी पिंजरा लावावा अशी ग्रामस्थांमधून जोरदार मागणी होत आहे.