![]() |
File photo |
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच जादूमय वलय प्राप्त झालेल्या अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या गोल्डन आर्मने कमाल केली. गोलंदाजीत त्याने ४ महत्वाचे बळी घेतल्यानंतर मागील दोन कसोटयात अपयशी ठरल्यानंतर शतकी खेळी करणाऱ्या स्टीव्हन स्मिथला अफलातून चेंडूफेक करून धावचित केले. स्मिथचा त्यावेळचा खेळ बघता भारताचा कोणताही गोलंदाज त्याला बाद करू शकेल असे वाटत नव्हते.
ऑस्ट्रेलियाच्या डावाची चर्चा करायची म्हंटले तर मागच्या दोन कसोटीत त्यांना एकदाही २०० धावांचा टप्पा ओलांडता आला नव्हता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे दोन प्रमुख फलंदाज स्मिथ व लाबुशने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत नव्हते. या सामन्यात त्यांच्या बॅटने करामत करताना अनुक्रमे १३१ व ९१ धावा ठोकल्या. त्यांच्या या खेळीमुळे ऑसीजना प्रथमच मालिकेत ३०० चा टप्पा ओलांडता आला. या दोघांच्या २२२ धावा वगळल्या तर इतर ९ जणांच्या मिळून अवांतर धावांसह केवळ ११६ धावा होतात. त्यातही पदार्पणवीर विल पुकोवस्कीच्या ६२ व तळातील स्टार्कच्या २४ धावा बाजूला केल्या तर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट जाणवतात. दोन बाद २०६ वरून ३३८ धावात त्यांचा संघ गुंडाळला गेला. सामन्याच्या पहिल्या दिवशी रिषभ पंतने दोन झेल सोडले नसते तर ऑस्ट्रेलियाच्या डावाची काय अवस्था झाली असती याची एकदा कल्पना तर करून बघा.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा संघ चांगला गृहपाठ करून मैदानात उतरला होता. पहिल्या दिवशी कर्णधार अजिंक्य राहाणेने रविंद्र जडेजाचा वापर कमी केला होता. तसा बघितलं तर पहिल्या दिवशी जवळ जवळ चाळीस टक्के खेळ पावसामुळे वाया गेला होता. परंतु दुसऱ्या दिवशी जडेजाने संधी मिळताच आपली कला पेश करत ऑस्ट्रेलियन डावाला लगाम घातला. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराहाने दोन, नवदिप सैनीने दोन व मोहम्मद सिराजने एक बळी घेऊन भारतासाठी मोलाची कामगिरी बजावली. मागच्या दोन कसोट्यात ऑस्ट्रेलियाचा व खास करून स्मिथचा कर्दनकाळ ठरलेला रविंचंद्रन आश्विन या डावात बळी मिळविण्यात अपयशी ठरला. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे स्मिथने आश्विनच्या गोलंदाजीचा केलेला सखोल अभ्यास व रिषभ पंतने आश्विनच्या गोलंदाजीवर पहिल्या दिवशी सोडलेला झेल हे होय. तो झेल पंतने झेलला असता तर कदाचित आश्विनच्या गोलंदाजीचे पृथक्करण वेगळेच दिसले असते.
भारताला सन २०१० नंतर विरेंद्र सेहवाग व गौतम गंभीरने द. आफ्रिकेत अर्धशतकी भागीदारी केल्यांनतर तब्बल ११ वर्षांनी परदेशात
( सेना देशात ) सलामीवीरांकडून अर्धशतकी भागीदारी मिळाली. सन २०१६ नंतर रोहित शर्मा व शुभमन गिल ही भारताची सोळावी सलामी जोडी ठरली. गिल व शर्माची ७० धावांची भागीदारी डावाला आकार देणारी ठरणार असे वाटत असताना दोघेही एका मागोमाग बाद झाल्याने भारताच्या धावसंख्येला खिळ बसली. चेतेश्वर पुजारा व कर्णधार राहाणे दिवसाच्या अंतिम टप्प्यात अतिबचावात्मक खेळल्याने दिवसअखेर संघाची अपेक्षित असलेली धावसंख्या होऊ शकली नाही.
आपला दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या शुभमन गिलने स्वतःचं कसोटीतील पहिलं अर्धशतक ठोकलं, परंतु मोठा डाव खेळण्याची संधी त्याने गमावली. तर ४१३ दिवसानंतर आपली पहिली कसोटी खेळणारा व दुखापतीतून सावरलेला उपकर्णधार रोहीत शर्मा त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर होती तशीच अवस्था दुसऱ्या दिवसाच्या शेवटी होती व तशीच शंकेची पाल भारतीय समर्थकांच्या मनात चुकचुकत आहे. भारत या डावात मोठी धावसंख्या उभारून ऑस्ट्रेलियावर आघाडी मिळवून कसोटी सामन्यावर वर्चस्व मिळवेल का ? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com