ब्रिस्बेन कसोटीसाठी भारताला अंतिम संघ बनविणे बनतंय कठीण


             कोणताही विदेश दौरा असला तर संघात नियमित खेळाडूंसह राखीव खेळाडूंचा साठाही प्रत्येक संघ करून ठेवतो. सोबत नेटमध्ये आपल्या फलंदाजांना सराव देण्यासाठी विशेष गोलंदाजांचाही समावेश केला जातो. शिवाय कोविड-१९ च्या संसर्गामुळे आणखीही काही खेळाडू प्रत्येक संघ आपल्या ताफ्यात ठेवत आहे. तसा खेळाडूंचा पूरक ताफा भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेला होता. परंतु या संपूर्ण दौऱ्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतीमुळे जायबंदी झाल्याने त्यांना संघाबाहेर जावे लागले व चौथ्या कसोटीत खेळण्यासाठी भारतीय संघाजवळ तंदुरूस्त खेळाडूंची वाणवा झाली.

                     सन २०२० मध्ये अति अल्प प्रमाणात क्रिकेट खेळले गेले. त्यामुळे खेळाडूंना स्वत:चा फिटनेस सांभाळण्यात अडचणी आल्या. शिवाय आयपीएल स्पर्धेत खेळाडूंवर अतिताण पडत असल्याने खेळाडूंच्या पूर्वीच्या शारिरीक दुखापती उफाळून आल्या. शिवाय त्यानंतर लगोलग ऑस्ट्रेलियाच्या भरगच्च दौऱ्याचे नियोजन असल्याने त्या खेळाडूंना दौऱ्यावर जाणे भाग पडले. 
                      ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ वनडे, ३ टि-२० व ४ कसोट्यांचा मोठा कार्यक्रम होता. भारताच्या या तिनही प्रारूपांतील संघात काही तेच खेळाडू निवडले गेले व खेळलेही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोन सामन्यांदरम्यान विशेष अंतर नसल्यामुळे खेळाडूंना स्वतःला सावरण्यास कमी अवधी मिळाला.
                       भारत व ऑस्ट्रेलिया हे तुल्यबळ संघ असल्याने दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये एकमेकांपेक्षा सरस ठरण्याची प्रतिस्पर्धा सुरू झाली. त्या दरम्यान खेळाडूंनी आपल्या क्षमतेपेक्षाही अधिक काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना खास करून हॅमस्ट्रींगचा त्रास उद्भवण्यास सुरूवात झाली. त्यामध्ये जांघेचा, मांडींचा किंवा पोटऱ्यांच्या त्रासाचा समावेश झाला. काही खेळाडू नेटमध्ये गंभिरतेने सराव न केल्याने जखमी झाले. तर काही खेळाडू चालू सामन्या दरम्यान शरिरावर अतिरिक्त ताण पडल्याने जखमी झाले. खास करून या दौऱ्यात भारतीय खेळाडूंना रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी शरीरवेधी गोलंदाजीचा अवलंब केला, की जेणे करून खेळाडूंचे चित्त विचलित व्हावे, शरीरावर चेंडूंचा मार बसू नये काही खेळाडू बाद होणं पसंत करतात. परंतु या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात भारताच्या खेळाडूंनी देशाच्या इज्जतीसाठी स्वतःच्या शरीरावर चेंडूचा भडीमार सहन केला. पण आपली विकेट प्रतिस्पर्ध्याला बहाल केली नाही. 
                     ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी अशाच एका शरीरवेधी चेंडूवर उजव्या हाताला दुखापत होऊन संघाबाहेर गेला. सिडनी येथील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने त्यांच्याच मायदेशात त्यांच्या अस्तित्वाला धक्का लागतोय हे बघून भारतीय फलंदाजांना टारगेट केले. त्या घडामोडीत भारताच्या पहिल्या डावात रविंद्र जडेजाच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला. त्याच डावात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या डाव्या हाताच्या कोपराला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने त्याला फ्रॅक्चर न झाल्याने दुसऱ्या डावात भारताला सामना वाचवून देणारी ९७ धावांची झोकदार खेळी केली. तर भारताच्या दुसऱ्या डावात  ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी प्रत्येक फलंदाजाला उसळत्या व शरीरवेधी गोलंदाजीने बेजार केले. या डावात भारताचे रवीचंद्रन आश्विन व हनुमान विहारी यांच्या शरीरावर अनेक चेंडू लागले. सुदैवाने त्यांच्या शरीराची कुठलीही मोडतोड झाली नाही. परंतु त्याच डावात हनुमान विहारी त्याच्या उदभवलेल्या हॅमस्ट्रींगच्या दुखापतीने चौथ्या कसोटीसाठी संघाबाहेर गेला. तर नेटमध्ये सराव करताना मयंक अग्रवाल मनगटाला झालेल्या दुखापतीने चौथ्या कसोटीला मुकू शकतो. 
                      या दौऱ्यात आतापर्यंत भारताचे नऊ प्रमुख खेळाडू गंभीर दुखापत झाल्याने संघाबाहेर गेले. त्यामुळे चौथ्या व मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने निर्णायक क्षणी भारतीय संघ प्रबंधनाजवळ तंदुरुस्त खेळाडूंची संख्या अतिशय कमी असून हुकमी गोलंदाज जसप्रित बुमराहाचेही पोटाचा स्नायू दुखण्यामुळे खेळणे असंभव वाटते. त्यामुळे अंतिम अकरा जणांमध्ये कोणते खेळाडू निवडले जातील हे जवळ जवळ स्पष्ट आहे. त्यामध्ये टि नटराजन हा नवोदीत जलदगती गोलंदाज कसोटी पदार्पण करू शकतो. जर असे झाले तर तो भारताचा तिनशेवा कसोटीपटू असेल.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post