सन २०२० मध्ये जीवनाची खेळी आटोपलेले दिग्गज क्रिडापटू


          " मरण कुणा न चुकले " ही ओळ शत प्रतिशत सत्य असली तरी ते आपल्या वाटयाला येऊ नये असे प्रत्येकालाच वाटत असते. कोणतीही वस्तू  सजिव किंवा निर्जिव असो ती एक दिवस नष्ट पावणार असते. परंतु सन २०२० मध्ये नानाविध परिणामांनी मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या मागील अनेक वर्षाच्या तुलनेत जरा जास्तच वाटली. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कोविड १९. कोरोना व्हायरस या नावाने प्रचलित असलेल्या या महाभयंकर आजाराने जगातील सर्वच देशातील नागरिकांना जेरीस आणले. हा महाभंयकर आजार औषध उपलब्ध नसल्यामुळे आटोक्यात यायला फार अवधी लागला. पण अजूनही प्रभावशाली औषध तयार नसल्याने या आजाराविषयी लोकांच्या मनात संभ्रम झाला आहे. सन २०२० या वर्षाने प्रत्येकाला वाईट अनुभव दिला. अनेकांना जगणे मुश्किल केले तर बऱ्याच जणांना मृत्येने आपल्या कवेत घेतले.

                     सन २०२० मध्ये कोविड१९ या विकाराने घातलेले मृत्यूचे तांडव सुरू असतानाच क्रिडा जगतातील काही दिग्गज खेळाडूंना इतर वेगवेगळया आजारांमुळे या जगाचा निरोप घ्यावा लागला.

                     २६ जानेवारी २०२० रोजी संपूर्ण क्रिडा विश्वाला दुःख सागरात लोटणारी घटना घडली. कोबे ब्रायंट या सुप्रसिद्ध अमेरिकन बास्केटबॉलपटूच्या निधनाने संपूर्ण क्रिडाविश्व हळहळले. कोबे ब्रायंट एका खाजगी हेलीकॉप्टरने कॅलीफोर्निया ते कॅलाबॅसस असा प्रवास करत असताना अपघात घडला. त्यामध्ये कोबे ब्रायंटला आपला जीव गमवावा लागला. याच अपघातात कोबे ब्रायंटसह प्रवास करणारी त्याची मुलगी व सहप्रवाशांचाही मृत्यू झाला.

                      छोट्याशा अर्जेंटीना या दक्षिण अमेरिकेन देशाला फुटबॉलच्या माध्यमांतून जगाच्या नकाशावर आणणारा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना २५ नोव्हेंबर २०२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावला. त्यामुळे फुटबॉल जगतासह समस्त क्रिडा विश्वाला जबरदस्त हादरा बसला. " हँड ऑफ गॉड '' दिएगो मॅराडोनाच्या पायात अशी काही कलाबाजी होती की, विरोधी संघाचे अकराचे अकरा खेळाडू जरी त्याला घेेरत असले तरी त्या सर्वांना चकवून तो चेंडू गोल जाळ्यात ढकलत असे. अशा या अद्भूत देणगी लाभलेल्या फुटबॉलपटूने एकट्याच्या जीवावर सन १९८६ मध्ये अर्जेंटीनाला फुटबॉलचा विश्वकरंडक जिंकून दिला होता.

                       ऑस्ट्रेलियाचा शानदार क्रिकेटपटू व जानदार क्रिकेट समालोचक डिन जोन्स सन २०२० च्या आयपीएल स्पर्धेच्या समालोचनासाठी आला असताना मुंबईच्या एक पंचतारांंकित हॉटेलमध्ये त्याला हृदयविकाराचा तिव्र झटका आला. २४ नोव्हेंबर २०२० हा दिवस ५९ वर्षीय डिन जोन्सच्या आयष्यातला शेवटचा दिवस ठरला. त्याच्या निधनाने संपूर्ण क्रिकेट जगत दुःखी झाले होते. जोन्स त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी खूप अविस्मरणीय डाव खेळला. परंतु सर्वात जास्त लक्षात राहीली ती सन १९८६ मध्ये चेन्नई येथे भारताविरूद्ध टाय झालेल्या सामन्यात केलेली २१० धावांची खेळी. या खेळी दरम्यान त्याला खूप ताप होता व उलट्या झाल्या होत्या.

                       भारताचे माजी सलामीचे फलंदाज व उत्तर प्रदेश सरकार मधील मंत्री चेतन चौहान वयाच्या ७१ व्या वर्षी कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आणि याच महाभयंकर आजाराने बळी पडले. कोरोना संक्रमीत झाल्यानंतर त्यांची किडनी फेल झाली. शेवटी गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटल मध्ये १६ ऑगष्ट २०२० रोजी त्यांची जीवनज्योत मालवली. चेतन चौहान भारताासाठी ४० कसोटी खेळले, २००० च्यावर धावा केल्या, मात्र त्यांना कसोटी शतकाने हुलकावणी दिली.

                       भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू बापू नाडकर्णी यांनी १७ जानेवारी २०२० रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. धावा देण्यात अतिशय कंजूष गोलंदाजी अशी ख्याती असलेल्या बापूजींनी कसोटीत सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम केला असून तो अजूनही अबाधीत आहे. आपल्या तेरा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दित ते ४१ कसोटी खेळले त्यामध्ये त्यांनी ८८ फलंदाजांना बाद केले होते तर फलंदाजीत १४१४ धावाही त्यांनी ठोकल्या होत्या.

लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

Email:  dattavighave@gmail.com


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post