सिडनीच्या तिसऱ्या कसोटीत भारत दहा तंदुरुस्त खेळाडूंसह खेळत असून भारतीय खेळाडू सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून खेळत आहेत, तर विरोधी ऑस्ट्रेलियन संघ सर्व प्रकारचे नियम धाब्यावर बसवून जिंकण्यासाठी खेळत असल्याचे चित्र या सामन्यात स्पष्टपणे दिसत असून संपूर्ण जग बघत आहे.
या संपूर्ण दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अखिलाडू वृत्तीचे दर्शन घडवित आहे. मैदानावर भारतीय खेळांडूचे चित्त विचलीत करण्याचे काम सतत ऑस्ट्रेलियाचा प्रत्येक खेळाडू करत आहे. यात प्रामुख्याने त्यांचा कर्णधार टिम पेन, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशने, मॅथ्यू वेड यांचा समावेश आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दौऱ्यातील सर्व सामन्यात पंचगिरी भारताच्या विरोधात झाली आहे. प्रत्येक सामन्यात भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाचे अकरा खेळाडू, मैदानातील दोन पंच व टेलिव्हिजन पंच सरळपणे आपले योगदान देत आहे. भारत फलंदाजी करत असताना भारताचा फलंदाज बाद नसला तरी मैदानातील पंच त्यांना बाद देतात व पुढे भारतीय खेळाडूने डिआरएस घेतला तरी टिव्ही पंच " अंपायर्स कॉल " या दळभद्री नियमाचा गैरफायदा घेत ऑस्ट्रेलियन संघाला त्याचा अनैतिक लाभ पोहोचवत आहे. इतकेच नाही तर भारतीय संघ गोलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद असला तरी मैदानातील पंच त्यांना नाबाद देतात व पुढे भारतीय संघाने डिआरएस घेतला तर टिव्ही पंच " अंपायर्स कॉल " चा लाभ ऑस्ट्रेलियन फलंदाजांना देत आहेत. मैदानात पंचगिरी करणारे ऑस्ट्रेलियन पंच तर गल्ली बोळातल्या पंचांसाठी अंपायरींग करत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयसीसी सध्या तटस्थ पंच नेमत नाही. परंतु आयसीसी अश्या नाठाळ पंचावर कारवाई करत नाही या मध्ये ही आयसीसीचा दुटप्पीपणा दिसत आहे. यामध्ये आयसीसीने त्वरीत हस्तक्षेप करण्याची गरज आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडू, मैदानातील पंच, तिसरा पंच भारताविरूद्ध उघड उघडपणे कारवाया असताना ऑस्ट्रेलियन पेक्षकही भारतीय संघाला त्रास देण्यात मागे नाही. सामन्याच्या दिवशी सिमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारताच्या जसप्रित बुमराहा व मोहम्मद सिराजला प्रेक्षकांतील काही अतिशहाण्या लोकांनी जातीयवादी, वंशवादी शिवीगाळ केली. त्याची रितसर तक्रार या दोन्ही खेळाडूंनी मैदानातील पंच, सामनाधिकारी यांच्याकडे केल्यानंतर बीसीसीआयने आपल्या खेळाडूंची बाजू घेत आयसीसीकडे रितसर तक्रार नोंदविली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड काही कारवाई करेल अशी अपेक्षा असताना सामन्याच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा मोहम्मद सिराज सिमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना त्याच प्रेक्षकांनी असभ्य व अभद्र भाषेत त्याला डिवचायला सुरूवात केली. त्यानंतर सिराजने मैदानातील पंचांकडे तक्रार केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्या सहा लोकांना मैदानाबाहेर घालविले. वास्तविक त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते.
भारतीय संघ फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियन गोलंदाज त्यांना जखमी करण्याच्या उद्देशाने अनेक वेळा शरीरवेधी गोलंदाजी केली. त्यात या सामन्यात भारताचे दोन महत्वाचे खेळाडू रिषभ पंत व रविंद्र जडेजा जखमी झाले त्यातील जडेजा तर या सामन्यातूनच नव्हे पुढील कसोटी साठीही संघातून बाद झाला आहे. खेळाडू डोक्यात चेंडू लागून जखमी झाला तर आयसीसीचा" कनकशन " नियम आहे. त्या अंतर्गत जखमी खेळाडू ऐवजी बदली खेळाडू देण्याची प्रथा आहे. परंतु इतर कोणत्याही अवयवाला गंभीर दुखापत झाल्यास त्याच्या ऐवजी त्या नियमान्वये बदली खेळाडू देण्याचा नियम नाही. या व अंपायर्स कॉल यांच्या संबंधात आयसीसीने तातडीने नियम बनविणे गरजेचे आहे. परंतु सध्या तरी भारताला रविंद्र जडेजाच्या सेवेवाचून वंचित राहावे लागेल हे नक्की !
राहिला विषय या चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी बाबत बोलायचं तर भारतीय संघ चौथ्या दिवशी काही शा दबावात असून त्यांच्यापुढे विजय मिळविण्याची संधी असली तरी सामना वाचविणे पहिले काम आहे. परंतु ऑस्ट्रेलियन संघ आपले कुटील डाव खेळून भारताचे आव्हान उधळून लावू शकतो.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com