साईकिरण टाइम्स |१३ डिसेंबर २०२०
श्रीरामपूर | क्रिकेटच्या आठशे वर्षांच्या इतिहासात जगभरातील कोणत्याही पितापुत्रांना जमली नाही ती कामगिरी येथील क्रिकेट पंच डॉ. दत्ता विघावे व त्यांचा सुपूत्र ऋषिकेश विघावे यांनी केली आहे. विघावे पितापुत्रांच्या कामगिरीची क्रिकेटच्या विश्वविक्रमात नोंद झाली आहे.
या पितापुत्रांच्या जोडीने सन २०१४ मध्ये अहमदनगर जिल्हा क्रिडा परिषद व महाराष्ट्र राज्य क्रिडा संचलनामार्फत घेतल्या गेलेल्या १४ वर्ष, १७ वर्ष व १९ वर्षांच्या मुलांच्या क्रिकेट स्पर्धांतील ३२ सामन्यात पंचगिरी करून कोणत्याही स्तरावरील अधिकृत मान्यताप्राप्त क्रिकेट सामन्यात पंचगिरी करण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे. विघावे पितापुत्रांनी केलेल्या पराक्रमाची विश्वविक्रमात नोंद व्हायला तब्बल सहा वर्ष लागली.
विघावे पितापुत्रांचा विश्वविक्रम नोंद झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह डॉ. दत्ता विघावे यांना मुंबई येथे हॉटेल सागर इंटरनॅशनल येथे ओएमजी वर्ल्ड रेकॉर्ड बुकने आयोजित केलेल्या एका रंगारंग कार्यकमात देण्यात आले आहे.
डॉ. दत्ता विघावे हे क्रिकेटचे ख्यातनाम प्रशिक्षक व समिक्षक असून त्यांची निपक्षप:ती पंचगिरी त्यांच्या लौकीकात विशेष झळाळी आणते. क्रिकेट समिक्षक म्हणून त्यांचे अकरा हजाराहून अधिक लेख विविध वृत्तपत्रे, वेब ब्लॉग व समाज माध्यमांतून प्रसिद्ध झाले आहेत. तसेच डॉ. दत्ता विघावे यांनी लिहिलेले अनेक संशोधनात्मक लेख माहितीचा खजिना असलेल्या गुगलने आपल्या वेबसाईडवर अपलोड केले आहे.
ग्रामिण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना परदेशात खेळण्याचा अनुभव येण्यासाठी गुणवान क्रिकेटपटूंना घेऊन परदेशवाऱ्याही केल्या आहेत. अनेक नामवंत क्रिकेटपटूंना त्यांनी मार्गदर्शनही केले आहे. क्रिकेटच्या सर्वच क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल अमेरिकेच्या ग्लोबल पिस युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे.
भारतातील क्रिकेट पंचाचा घसरता दर्जा व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पंचाची असलेली वाणवा बघता डॉ. विघावे लवकरच भारतातील गुणवान हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी भारतातील होतकरू पंचांसाठी पहिली खाजगी क्रिकेट अकेडमी सुरू करणार आहेत.