File photo
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची कामगिरी शंभर टक्के समाधानकारक नसली तरी पहिली कसोटी वगळता नक्कीच चांगली झाली आहे. वनडे मालिका गमावल्यानंतर टि-२० मालिकेत भारताने बाजी मारली. त्यानंतर सुरू झालेल्या ४ कसोट्यांच्या मालिकेतील पहिल्या दिवस रात्र कसोटीत पहिले दोन दिवस वरचष्मा गाजविल्यानंतर १९ डिसेंबरला सामन्याचा पहिल्या सत्रातील ९० मिनिटे भारताला फार जड गेले. भारताच्या क्रिकेट इतिहासातील निच्चांकी धावांवर त्या दिवशी भारताचा संघ गडगडला आणि भारतीय क्रिकेटमध्ये हाहाकार माजला. त्याच सामन्यात भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज मोहम्मद शमी जखमी होऊन पूर्ण कसोटी मालिकेतून बाद झाला. हे कमी की काय म्हणून कर्णधार कोहलीही मायदेशी परतला. आधीच कसोटी संघातले प्रमुख खेळाडू रोहीत शर्मा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार संघात नसल्याने संघ आधीच पंगू झाला होता.या सर्व बिकट परिस्थितीचा सामना करत भारताचा संघ मेलबोर्न येथील एमसीजीवर बॉक्सिंग डे कसोटीसाठी दाखल झाला. संघात चार मोठे बदल करून संघाची धुरा उपकप्तान अजिंक्य राहाणेच्या खांद्यावर टाकण्यात आली. बीसीसीआयच्या निवड समितीने अजिंक्य राहणेला जरी उर्वरीत तीन सामन्यासाठी कर्णधार केले असले तरी त्याच्या नेतृत्व क्षमतेवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हता. भले त्याने यापूर्वी भारतात कोहलीच्या गैरहजेरीत अफगाणिस्तान व ऑस्ट्रेलियाला धूळ चारली असली तरी ऑस्ट्रेलियातील आव्हान कडवे होते. शिवाय त्याची बॅटही बऱ्याच दिवसांपासून त्याच्यावर रूसली होती.
![]() |
या सर्व शंका व संशयाच्या गदारोळात राहाणे बॉक्सिंग डे कसोटीसाठी सज्ज झाला. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने कर्णधार म्हणून सर्वांना प्रभावित करत यजमान कांगारुंच्या नांग्या ठेचल्या तर दुसऱ्या दिवशी बॅटच्या साह्याने संघाला संकटातून बाहेर काढून झुंजार शतक ठोकले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्याकडून मोठया धावसंख्येची अपेक्षा असताना त्याच्या कसोटी कारकिर्दीत प्रथमच दुर्देवीरित्या धावबाद झाला. त्यानंतर मात्र भारताला मोठी आघाडी घेण्याचे स्वप्न भंगले. पहिल्या कसोटीत राहाणेच्या चुकीमुळे कोहली धावबाद झाला होता व त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. तीच गत या सामन्यात झाली. नाहीतर भारत आणखी मोठी आघाडी घेऊ शकले असते.
ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीत १९१, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात १९५ व दुसऱ्या डावात ६ बाद १३३ अशी माफक धावसंख्याच करू शकले आहे. भारताच्या धारदार व भेदक गोलंदाजीपुढे मायदेशात कांगारू एकदाही २०० चा टप्पा ओलांडू शकले नाही. या वरून भारताच्या प्रभावी गोलंदाजीची कल्पना येते. दुसऱ्या दिवसअखेर कांगारू २ धावांनी आघाडीवर असून त्यांचे ४ गडी बाद होणे बाकी आहे. ६ बाद ९९ अशा स्थितीतून कमिन्स व ग्रीनने कांगारूंचे आजचे मरण उद्यावर ढकलले आहे.
चौथ्या दिवशी सकाळच्या ताज्या वातावरणात भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या ४ कांगारूंना झटपट गुंडाळावे व मिळालेले आव्हान भारतीय संघाने अतिरिक्त धोका न पत्करता आरामात पार करून मालिका बरोबरीत आणावी हि समस्त भारतीयांची पहिली अपेक्षा आहे.
पहिल्या कसोटीतील ३६ धावांचं भूत भारतीय फलंदाजांनी डोक्यातून काढावे. संघ एकजीव असल्यास समोरचा प्रतिस्पर्धी कितीही बलवान असला तरी त्याला त्याच्या गुहेत घुसून मारता येऊ शकते. हे भारतीय संघाच्या या सामन्यातील कामगिरीवरून स्पष्ट होते. उद्याची सकाळ भारतीय क्रिकेटसाठी शुभमंगल ठरो हिच मंगलमय आशा व संघास शुभेच्छा !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com