साईकिरण टाइम्स | २९ डिसेंबर २०२०
श्रीरामपूर | नागेबाबा उद्योग समुह यांच्या प्रेरणेने महाराजा बहुउद्देशीय प्रतिष्ठान व सोशल सर्व्हिस फौंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील "समाजरत्न पुरस्कार" सार्वमतचे ज्येष्ठ पत्रकार व दूरदर्शनच्या डी. डी. न्यूजचे नगर जिल्हा प्रतिनिधी प्रा.ज्ञानेश गवले यांना जाहीर झाला आहे.
बुधवार दि.३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता उत्सव मंगल कार्यालयात मेळघाट(अमरावती) येथील आदिवासी बांधवासाठी अविरत कार्य करणारे पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे व पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरित केला जाणार आहे.अध्यक्षस्थान गोविंद गो-शाला प्रमुख पं. महेश व्यास भूषविणार असुन यावेळी सर्वश्री नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडुभाऊ काळे,प्रेरणा मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे पा.,उद्योजक व किसान कनेक्ट फार्मसीचे किशोर निर्मळ,राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित बबनराव तागड, बालरोग तज्ञ डॉ. कुमार चोथाणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक रामपाल पांडे व सोशल सर्व्हिस फौंडेशनचे सुरज सुर्यवंशी यांच्या अधिपत्याखाली हा सोहळा संपन्न होत आहे.
प्रा.ज्ञानेश गवले हे दूरदर्शनचे जिल्ह्यातुन संधी मिळालेले पहिले निवेदक आहेत. त्यांनी बोल अनुभवाचे, आजचे पाहुणे, स्वातंत्र्याचा उद्घोष, कलारंग,कलादर्पण आदी २५० हुन अधिक कार्यक्रमांचे सुत्रसंचालन-निवेदन केले आहे."लोकप्रिय माझी माय" या कार्यक्रमांच्या १५१ भागांचे परिचय लेखन केले आहे. या शिवाय वार्तांकणाच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य लोकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देत अनेक प्रश्नावर आवाज उठविला आहे.२६/११ च्या मुंबई अतिरिकी हल्ल्यातील कव्हरेज बद्दल त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. यासह विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे. ३१ वर्षांपासून ते पत्रकारितेत आहेत. सार्वमत-लोकमत समूहातही त्यांनी नोकरी केली आहे.या कार्याची दखल घेऊन त्यांना हा इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.