अल्पसंख्याकांसाठी विविध योजनांची गरज; पिरजादे

साईकिरण टाइम्स | १९ डिसेंबर २०२०

श्रीरामपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समुदायासाठी विविध योजनांची गरज असून वेगवेगळ्या विभागाच्या योजनातुन विकास करता येईल. शासनाने अल्पसंख्याक विभाग निर्माण केला तरी त्या विभागासाठी निधीची भरीव तरतूद करावी. सीएसआर फंडाचा उपयोगही त्यासाठी करता येईल. अल्पसंख्याकांच्या विकासासाठी बचत गट व विविध संस्था यांनी पुढे येऊन समाजाच्या विकासाला हातभार लावावा. स्वयंसेवी संस्थांनी त्यामध्ये जागरूक होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन यशदाचे माजी अधिकारी रियाज पिरजादे यांनी केले.

अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हा शाखेतर्फे काल ऑनलाईन वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातील व्यक्तींनी सहभाग नोंदवला. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री पिरजादे बोलत होते.

शासनाने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्व खात्यांच्या निधीमध्ये कपात केली आहे. केंद्राच्या निती आयोगाच्या सहकार्याने सध्या मी मराठवाड्यामध्ये अल्पसंख्यांकांच्या योजनांवर काम करीत असून पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आग्रह राज्यातील अल्पसंख्यांक संस्थांनी धरला पाहिजे असेही पिरजादे यांनी सांगितले .

अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी राज्य सरकार अल्पसंख्यांकाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगून अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या विविध योजना राबविताना हेळसांड केली जाते. अल्पसंख्यांकांचा वापर फक्त मतांसाठी केला जातो. एससी,एसटीच्या विद्यार्थ्यांना ज्या सवलती दिल्या जातात त्या सवलती अल्पसंख्यांक समुदायातील सर्व घटकांना मिळाल्या पाहिजे. समाजाने आर्थिक दृष्ट्या कमकुवत गटासाठी  केंद्र शासनाने सुरु केलेल्या इ डब्ल्यू एस योजनेचा लाभ घ्यावा तसेच अल्पसंख्याक शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यात यावी असे मत व्यक्त केले.

 शकील बागवान यांनी शाळा व्यवस्थापन समित्या सक्षम करून त्याद्वारे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा विकास साधता येईल. अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यासाठी शासनाने दहा लाख रुपयांची तरतूद केली. पण खर्च कुठे केला ? याचाही खुलासा झाला पाहिजे असे ते म्हणाले.

 शिक्षण विभागाचे कार्यक्रम अधिकारी आसिफ शेख यांनी अल्पसंख्याकांसाठी सच्चर आयोगाने सुचविलेल्या शिफारशींची माहिती दिली. तसेच शैक्षणिक सुधारणा होणे आवश्यक असून पंतप्रधान पंधरा कलमी कार्यक्रम प्रशासनाने प्रभावीपणे राबवावा अशी सूचना करून अल्पसंख्यांक विकास विभागाचे काम शून्य आहे असे सांगितले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष व श्रीगोंद्याचे गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी अल्पसंख्यांकांबाबत समाजातील सुशिक्षितांनी पुढे येऊन जागृती करावी. सर्वांनी एकत्र येऊन विचारविनिमय करावा व समाजाचा विकास करण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. सोलापूरचे अब्दुल मजिद शेख यांनी प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधी घेऊन राज्यस्तरीय समिती बनवावी व त्याद्वारे अल्पसंख्यांक योजना जागृती करावी असे सांगितले.मुख्याध्यापक नासीर खान यांनी शासनाने माध्यमिक शाळांसाठी जो कर्मचारी आकृतीबंध निश्चित केला आहे तो शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर अन्याय करणारा असल्याने तो रद्द करावा अशी मागणी केली. अब्दुल अजीम (बीड) यांनी दर महिन्याला अशी मीटिंग घ्यावी असे सुचविले. प्रास्ताविक व आभार पदवीधर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रहमान शेख यांनी तर सूत्रसंचालन आसिफ लतीफ शेख यांनी केले.

या वेबिनार मध्ये सर्वश्री. अन्सार शेख, अली सय्यद, अश्रफअली साबिर शाह, जावेद आतार, अयुब इनामदार, फय्याज शेख, जबीन शेख, कलीम शेख, मोहम्मद हनीफ शेख, मिनाज शेख, शाहीन अहमद, तबस्सुम पठाण, रजिया शेख, एम एम शेख, गौसिया शेख, अब्दुल जब्बार सय्यद, अनिस शेख, बसरिया इनामदार, जमीरअहमद शेख , वहिदा सय्यद, अलीम शेख, फैजा शेख, मोहम्मद समी शेख, तरन्नुम शेख, फिरोज शेख आदींनी सहभाग घेऊन मौलिक सूचना केल्या.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post