साईकिरण टाइम्स | ५ डिसेंबर २०२०
श्रीरामपूर | जीवनाचे उद्दिष्ट एखाद-दुसरे यश बनवण्याऐवजी संपूर्ण जीवनप्रवास यशाचा व्हावा यासाठी प्रयत्नशील रहा, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी केले.
श्रीरामपूर येथील जयहिंद करियर अकॅडमीच्या एकाच वेळी अठरा विद्यार्थ्यांची भारतीय सेना दलात निवड झाल्याबद्दल डॉ. काळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून सेवेत दाखल होण्यासाठी निरोप देण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, कामगार नेते जीवन सुरुडे, विधीज्ञ समीन बागवान, कामगार तलाठी राजेंद्र घोरपडे, मेजर शंखेश पांडव, जय हिंदचे संचालक सुयोग सस्कर, बाळासाहेब वाणी, अजय बत्तीशे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना जयहिंद अकॅडमीचे संचालक सुयोग सस्कर म्हणाले की, गेल्या चार वर्षांत अकॅडमीच्या माध्यमातून पन्नासहून अधिक उमेदवारांनी सेनादल, नौदल, हवाईदल, पोलीस दल, रेल्वे, न्याय विभाग, शिक्षण विभाग आदी क्षेत्रात यश मिळवले आहे. दरवर्षी यशस्वी उमेदवारांची संख्या वाढत असून या वर्षी एकाच परीक्षेत सर्वाधिक अठरा उमेदवारांची निवड झाली आहे. 'जयहिंद'च्या शिक्षकांचे मार्गदर्शन व उमेदवारांची मेहनत याचे हे फळ आहे.
यावेळी सैन्य दलात निवड सत्कारमूर्तींपैकी मयुर कणसे, निखील गायके, दीपक भवर यांनी मनोगत व्यक्त केले. मेजर शंकेश पांडव यांनी प्रशिक्षणार्थी सैनिकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीकृष्ण बडाख यांनी केले. रवी त्रिभुवन यांनी आभार मानले. कार्यक्रमास विष्णु लबडे, सुनील डहाळे, दिपक भांड, विठ्ठल सस्कर, राहुल दाभाडे, भाऊसाहेब चोथे तसेच निवड झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.