अजिंक्य राहाणेच ठरला विजयाचा शिल्पकार

                                     File Photo

        भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या दिवस रात्र कसोटी भारताचा पूर्ण संघ अवघ्या ३६ धावात उखडल्याने भारताला एक किळसवाणा पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे समस्त क्रिकेट जगतात भारतीय संघाची फार मोठी नाचक्की झाली होती. या एका पराभवाने भारतीय क्रिकेटला फार मोठ्या हेटाळणीला सामोरे जावे लागले होते. ज्यांना कुणाला क्रिकेटमधील ओ की ठो कळत नव्हतं ते स्वयंघोषित क्रिकेट पंडितही भारतीय क्रिकेटबद्दल भरभरून बोलायला लागले होते. त्याच पार्श्वभूमिवर सहा दिवसांच्या गॅपनंतर मेलबोर्नच्या भव्य मैदानावर बॉक्सिंग डे कसोटीला सुरूवात झाली.        

                 पहिल्या कसोटीतील पराभवानंतर संघात अमूलाग्र बदल करण्यात आले.  हंगामी कर्णधार अजिंक्य राहाणेला कोणताही क्रिकेट पंडित महत्व द्यायला तयार नव्हता. शिवाय संघात गिल व सिराज सारखे नवे चेहरे असल्याने संघाला मागच्या सामन्याच्या तुलनेत अति कमजोर समजले जाऊ लागले. शिवाय गोलंदाजीत शमी नसल्याने तेथेही संघाला मागास गणण्यात आले. राहाणेचा यापूर्वीचा कसोटी कर्णधार म्हणून रेकॉर्ड शंभर टक्के यशस्वी होता. परंतु ते दोन्ही सामने भारतात झालेले असल्याने त्याच्या त्या विक्रमालाही कोणी भाव द्यायला तयार नव्हते. शिवाय त्याचा फलंदाजीतील गोल्डन टच नसल्याने त्याला फलंदाज म्हणूनही हवी ती किंमत द्यायला तयार नव्हते.
                      परंतु शांत व संयमी डोक्याच्या मराठमोळ्या अजिंक्य राहाणेने डोक्यावर बर्फाची लादी व तोंडात खडी साखरेचा खडा ठेवून बॅटला मोहाचे तेल लावले. याचा सरळ सरळ फायदा राहाणे व चमूला झाला. भारताचा संघ या सामन्यात जखमी वाघासारखा चवताळून उठला व मुजोर कांगारूंना दोन्ही डावात दोनशेच्या आतमध्ये रोखून बॉक्सिंग डे कसोटीत जोरदार पंच दिला.
                       संपूर्ण सामन्यात त्याने लावलेले क्षेत्ररक्षण, गोलंदाजीत केलेले बदल, विरोधी खेळाडूंच्या कच्च्या दुव्यांचा बारकाईने केलेला  अभ्यास, संघातील प्रत्येक खेळाडूस बरोबर घेऊन चालण्याची पद्धत यामुळे संघातील वातावरण एकदम निवळले. कोहलीच्या उपस्थितीत इतर खेळाडूत असलेले भितीचे वातावरण या सामन्यात जाणवले नाही. त्यामुळे प्रत्येक जण मैदानात खुलेपणाने वावरत होता. याचाच परिणाम संघाच्या कामगिरीत बदल होण्यात झाला. क्षेत्ररक्षण करताना प्रत्येक क्षेत्ररक्षकाने जीव तोडून क्षेत्ररक्षण केले. एरव्ही हातातून निसटणारे झेलही चुंबकाप्रमाणे खेळाडूंच्या हाताकडे आकर्षित झाले. गोलंदाजातही वेगळंच बळ संचारलं. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात प्रमुख वेगवान गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाल्यानंतरही उर्वरीत गोलंदाजांनी त्याची उणीव भरून काढली.  मयंक अग्रवाल वगळता प्रत्येक फलंदाजांनी आपआपला वाटा दिला. या सर्वात उठून दिसली ती कर्णधार राहाणेची झुंझार शतकी खेळी. या खेळी दरम्यान त्याने संघात जोश भरला. त्याचा लाभ भारताला ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमित लोळविण्यासाठी झाला. 
                        भारताच्या संघात एवढा बदल घडविण्यात कर्णधार राहाणेचा मोठा वाटा होता. या शतकी खेळी दरम्यान राहणेने अनेक विक्रम मोडले. शिवाय स्वतःचा शंभर टक्के यशस्वी कर्णधाराचा शिक्का आणखी पक्का केला. राहाणेच्या या शानदार कामगिरीमुळे त्याची वैयक्तीक प्रतिमा उजळलीच शिवाय भारताला कमजोर समजणाऱ्या कांगारूंवर त्यांच्याच मायभूमीत जोरदार शह दिला. राहणेने नावाप्रमाणेच अजिंक्य राहात उर्वरीत दोन कसोट्यात हेच टेम्परामेंट जपलं तर भारत कांगारूंना ३- १ अशी मात सहज देऊ शकतो.
                       अजिंक्य राहाणेच्या थंड डोक्यातून साकारलेला हा विजय म्हणजे राखेतून जिवंत झालेल्या फिनिक्स पक्षाप्रमाणेच आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये. तसेच येत्या काही दिवसात राहाणे भारताचा पूर्णवेळ कसोटी कर्णधार झाल्यास कोणी आश्चर्यही मानू नये.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post