स्वतः उपाशी राहून कामगार करताहेत शहराची आरोग्यसेवा


साईकिरण टाइम्स | १६ डिसेंबर २०२०

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

गाडी आमची आली रे ... घंटागाडी आली रे ...

चला चला चला लवकर...आणा आपला कचरा रे...

चला चला चला लवकर

आणा आपला कचरा रे

ओला कचरा सुका कचरा

आणा आपला कचरा रे

लहान थोर आबालवृद्ध

सारे जागरूक होऊ रे

लवकर कचरा आणून द्या

आम्ही पुढच्या गल्लीत जाऊ रे ...

     रोज सकाळी हे गाणं श्रीरामपूर शहराच्या गल्लीबोळातून सध्या रोज ऐकू येत आहे. नगरपालिकेच्या आरोग्य खात्याने दिलेले शहरातील सफाईचे टेंडर ठेकेदाराने मध्ये सोडून दिल्याने आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न काही दिवसांपूर्वी निर्माण झाला होता. त्यावर आरोग्य खात्याच्या कायम कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कामगारांचे घेऊन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे हे आरोग्याचा प्रश्न हाताळीत आहेत.

सोळा कचरा गाड्या व सहा ट्रॅक्‍टरच्या साह्याने सुमारे तीनशे कामगार दररोज शहरातील कचरा उचलणे, गटर सफाई व इतर साफसफाईची कामे करतात. रोजंदारीवरील कामगारांना मागील तीन महिन्यापासून पगार मिळालेला नाही. कामगार नेते जीवन सुरूडे यासाठी धडपड करीत आहेत. नगर पालिका प्रशासन व जिल्हाधिकारी तसेच नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या माध्यमातून रोजंदारीवरील कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

पालिकेच्या भोंगा लावलेल्या १६ घंटागाड्या दररोज सकाळी सहा वाजता शहराच्या विविध भागात रवाना होतात आणि सकाळी सकाळी वरील प्रमाणे घंटागाडीवरचं गाणं वाजत असतं.गाणं सुरू झालं कि परिसरातील लोक पटापट आपला कचरा आणून गाडीत टाकतात. गाडीवरील कामगार तो सगळा गोळा करतात आणि गाडी पुढे रवाना होते.

 शहरवासीयांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये म्हणून रोजंदारीवरील कामगारांनी मोठे सहकार्य नगरपालिका प्रशासनाला देऊ केले आहे. दिवाळीआधीपासून त्यांना पगार मिळालेला नाही. ऑक्टोबर मध्ये ठेकेदार अचानकपणे काम सोडून पळून गेला.तेरा नोव्हेंबरला त्याने काम बंद केलं. आठवडाभर काम बंद राहिलं.परंतु जीवन सुरूडे यांच्या पुढाकाराने वीस नोव्हेंबर पासून आजपर्यंत रोजंदारीवरील कामगार आरोग्य सेवेमध्ये काम करत आहेत. नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल व या कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळेल अशी अपेक्षा आहे. पुढील काळामध्ये नगरपालिकेने कचऱ्याचा ठेका देण्याच्या भानगडीत न पडता आपल्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांमार्फतच शहरातील साफसफाईचे काम करावे. मदतीला रोजंदारीवरील कामगार घ्यावेत. मध्यस्थ व दलाल यांच्यापासून हा ठेका मुक्त करावा आणि शहरवासीयांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. आज सकाळी घंटागाडी वरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता तीन महिने झाले पगार नाही. पण पगार मिळेल या अपेक्षेने आम्ही दररोज सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत हे काम करीत असतो. यामध्ये नागरिक ही सहकार्य करतात. काही ठिकाणी नागरिक असहकार्य करतात. अशा भावना कचरा गाडीवरील ड्रायव्हर व महिलांनी बोलून दाखविल्या. घंटागाड्यांमुळे शहरातील सर्व भागातील साफसफाई दररोज होत आहे. काही ठिकाणी जादा कचरा ट्रॅक्टर उचलून नेतात. सोळा घंटा गाड्या,सहा ट्रॅक्टर त्यांच्या जोडीला आरोग्याच्या वेगवेगळ्या विभागातील 247 रोजंदारीवरील कामगार हे दररोज आरोग्य सेवेचे कार्य चांगल्या प्रकारे करीत आहेत.


कामगारांचा प्रश्न सुटावा

नगर पालिकेतील सत्ताधारी, विरोधक व प्रशासन यांनी एकत्रितपणे रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सोडवला पाहिजे. शहरवासीयांची आरोग्य सेवा आज मितीस उपाशी राहून हे सर्व कामगार करीत आहेत. याबाबत मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. ठेकेदाराला दिले जाणारे मानधन हे या रोजंदारीवरील कामगारांना पालिकेमार्फत देऊन त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवितानाच शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न देखील सुटणार आहे. वीस नोव्हेंबर पासून हे कामगार दररोज काम करीत आहेत. माहे ऑक्टोबर व तेरा नोव्हेंबर पर्यंतचे त्यांचे पगार बाकी आहेत. ठेकेदार मध्येच का पळून गेला त्याला अनेक कारणे आहेत. परंतु त्या खोलात न जाता सध्या कामगारांना रोजीरोटी मिळणे आवश्यक आहे. याबाबत नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे . 

  -जीवन सुरूडे, कामगार नेते 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post