महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेची प्रांत कार्यालयावर निदर्शने

साईकिरण टाइम्स | ३ डिसेंबर २०२०

श्रीरामपूर | दिल्ली येथील शेतकरी आंदोलकांवरील केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान महासभा सलग्न श्रमिक शेतकरी संघटनेच्यावतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयावर निदर्शन करण्यात आले.

कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथील शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी तसेच आंदोलकांवर केंद्र सरकार करत असलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ देशभरात शेतकरी संघटनांनी आज देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचाच भाग म्हणून श्रमिक शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. श्रीरामपूर येथेही घोषणा व निदर्शन करून तहसीलदार यांच्या माध्यमातून निषेधाचे निवेदन केंद्र सरकारला पाठवण्यात आले.

यावेळी 'श्रमिक'चे प्रदेश अध्यक्ष कॉ. राजेंद्र बावके म्हणाले की, शेतकरी संघटनांशी चर्चेशिवाय घाईघाईने कृषी संबंधित अध्यादेश केंद्र सरकारने काढले.  त्यानंतर त्यांचे कायद्यात रूपांतर करतानाही  संसदेत चर्चा करण्यात आली नाही. कोणत्याही शेतकरी संघटनेने मागणी केली नसताना शेतकरी हिताच्या नावाखाली हे कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. हे लोकशाही प्रक्रियेला धरून नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवावा, अशी त्यांची आजवरची वाटचाल नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत त्यांनी घूमजाव केले आहे. तोंडी आश्वासनाऐवजी किमान आधारभूत किमतीचा कायदा करण्यात त्यांना काय अडचण आहे? महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे अध्यक्ष कॉ. बाळासाहेब सुरुडे म्हणाले की, शेतकरी आंदोलकांवर दडपशाही करून आंदोलन मोडून काढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न त्यांच्या अंगलट येणार आहे. संपूर्ण देशातील शेतकरी आंदोलकांसोबत आहे.

यावेळी दिल्ली येथील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक  कॉ. जीवन सुरुडे यांनी केले तर निदर्शनात  कॉ.  मदिना शेख, कॉ. शरद संसारे,  कॉ. धनंजय कानगुडे, कॉ. श्रीकृष्ण बडाख, राहुल दाभाडे, उत्तम माळी, बाबूलाल पठाण, भीमराज पठारे, जावेद पठाण, अश्रू माळी, अनिल बोरसे, रंगनाथ दुशिंग, मिठूभाई शेख,  सुनील ठाकर, रामेश्वर मते, मल्हारी भोळे, भाऊसाहेब गागरे, राजमहमद जहागीरदार, शरीफभाई शेख, गणपत जाधव, भारत जाधव, संदीप राखपसरे, चंद्रकांत दळवी, नारायण शेलार, अरुण अस्वले, अस्लम शेख, राजेंद्र राऊत, कचरू गायकवाड, अमोल लबडे, बाळासाहेब चव्हाण आदि सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post