शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्याचे आदेश पारित करणार; मंत्री थोरात यांचे आश्वासन

साईकिरण टाइम्स | १५ नोव्हेंबर २०२०

संगमनेर | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अडचणीत असल्याने किमान एक वर्ष कर्जमाफी होऊ शकणार नाही, अशी हतबलता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. मात्र, कुठल्याही कर्जदार शेतकर्‍याकडून सक्तीची वसुली करू नये तसेच त्यांना जिल्हा बँकेमार्फत नवीन कर्ज देण्याचे आदेश पारित करणार असल्याची माहिती, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिली.

निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे या मागणीसाठी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मंत्री थोरात यांच्या घरासमोर दिवाळीच्या दिवशी 14 नोव्हेंबर रोजी चटणी-भाकरी खाऊन आंदोलन केले. यावेळी मंत्री थोरात यांनी आंदोलकांशी चर्चा करताना वरील माहिती दिली. चर्चेदरम्यान  तालुकाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप, हरिभाऊ तुवर आदी पदाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा मंत्री थोरात यांच्यासमोर मांडल्या. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेत रक्कमेची, क्षेत्राची व तारखेच्या असलेल्या जाचक अटी अजही तशाच असल्याने राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकेत गेल्या 20 वर्षांपासून कर्जमाफ मिळाली नाही. ी मिळाली नाही. पर्यायाने या शेतकर्‍यांना गेल्या 20 वर्षांपासून कर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यातच काही बँकांकडून अडचणीच्या काळात शेतकर्‍यांना वसुलीच्या नोटीसा आल्यात. काहींना 440 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा बँकांकडून दिल्या जात आहेत. बँकांकडून नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अनेक शेतकर्‍यांनी व्यापारी बँकांकडून अधिक व्याजदराने शेतीसाठी कर्ज घेतले आहेत.

यासर्व पार्श्वभूमीवर पिचलेल्या, त्रासलेल्या शेतकर्‍याला आधार देण्याऐवजी सरकारकडून, बँकांकडून त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसल्याची बाब आंदोलकांनी मंत्री थोरात यांच्या निदर्शनास आणून दिली.

आंदोलकांचे पूर्ण म्हणने ऐकल्यानंतर थोरात म्हणाले, महाआघाडीच्या प्रचारादरम्यान शेतकर्‍यांचा सात/बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भारतासह सर्व जगाला सतावणार्‍या कोराना संकटामुळे महाराष्ट्र राज्य सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे इच्छा असूनही शेतकर्‍यांना आणखी वर्षभर तरी कर्जमाफी करता येणार आहे. मात्र शेतकर्‍यांना दिला देण्यासाठी बँकांकडून सक्तीची वसुली होऊ नये तसेच नवीन कर्ज देण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांमार्फत तात्काळ काढला जाईल असे आश्वासन थोरात यांनी दिले.

यावेळी आकारी पडीत कृती समितीच्या वतीने संपतराव मुठे व शरद आसणे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीत जमिनीबाबत निवेदन देऊन महसूल मंत्र्याचे लक्ष वेधले. आंदोलनात तालुकाध्यक्ष अनिल औताडे, हरिभाऊ तुवर, कडू पवार, बबन उघडे, शरद आसणे, दिलीप औताडे, नारायण पवार, इंद्रभान चोरमल, बाबासाहेब राऊत, सिताराम औताडे, सचिन औताडे, देविदास वाघ, राहूल तारडे, मनोज औताडे, विलास औताडे, दादा चोरमल, कैलास पवार, दत्ता जाधव, सिताराम जाधव, भाऊसाहेब बडाख, राहूल तारडे, संपत मुठे, अशोक धनवटे, भास्कर तुवर, मोहन तुवर, अहमदभाई शेख, बाळासाहेब कदम, बाळासाहेब आसणे आदी शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविला. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post