शहरातील कचरा वाऱ्यावर सोडून गेलेल्या पालिकेच्या ठेकेदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार


साईकिरण टाइम्स | १६ नोव्हेंबर २०२०

श्रीरामपूर | शहरातील घन कचरा व्यवस्थापन वाऱ्यावर सोडून गेलेल्या पालिकेच्या ठेकेदाराची तक्रार आज अहमदनगर जिल्हा नगर पालिका कामगार कर्मचारी युनियनच्यावतीने कॉम्रेड जीवन सुरुडे व कामगार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. शहरातील आरोग्याचा प्रश्न त्यामुळे बिकट बनला असून शेकडो कामगारांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असल्याने याप्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज सकाळी शहरास भेट दिली. येथील विश्रामगृहावर प्रांताधिकारी अनिल पवार, पालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, पोलिस निरीक्षक आयुष नोपानी आदी उपस्थित होते. जीवन सुरूडे यांनी शहरातील स्वछतेचा खेळखंडोबा कसा झाला आहे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली. घनकचरा व्यवस्थापनाचे ठेकेदार सुधर्म यांनी दोन महिन्याचे कामगारांचे पगार थकित ठेवून दिवाळीच्या दोन दिवस अगोदर कुठलीही पूर्वसूचना न करता पलायन केले.  त्यामुळे स्वच्छतेचा मोठा प्रश्न तयार होऊन पालिका प्रशासन व कंत्राटी कामगार यांनी केलेल्या कामाचे वेतन मिळणे तर दूरच नोकरी गेल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. ही बाब सुरूडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. याशिवाय कामगारांचे थकीत पगार तातडीने करावे, सर्व कामगारांना पूर्ववत कामावर रुजू करून घेण्यात यावे, अकार्यक्षम ठेकेदार मे. सुधर्म एजन्सी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, घनकचरा  व्यवस्थापनाची नवीन निविदा प्रक्रिया तातडीने करण्यात यावी या मागण्यांचे  निवेदन जिल्हाधिकारी यांना युनियनच्या वतीने देण्यात आले. जिल्हाधिकारी भोसले यांनी याप्रश्नी तातडीने शहराचा स्वच्छतेचा प्रश्न व कंत्राटी कामगारांचे प्रश्नांबाबत  तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी ढेरे यांना दिले.

निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांनाच रस्त्याची कामे...

शहरातील रस्त्यांचे निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी 'साईकिरण टाइम्स'ने श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाकडे केली होती. त्याची दखल न घेता पालिका प्रशासन पुन्हा त्याच ठेकेदारांना रस्त्याची कामे देऊन जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. मुख्याधिकारी व बांधकाम विभागातील संबंधित प्रमुख अधिकारी तक्रारीची दखल घेत नसून ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत. कर्तव्यात कसूर करणाऱ्या पालिका प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे करणार आहे. 
                --- राजेश बोरुडे

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post