साईकिरण टाइम्स | 5 नोव्हेंबर 2020
श्रीरामपूर तालुक्यात शेतीमाल साठविण्यासाठी जिनिंग मील अथवा कोल्ड स्टोरेज वेअर हाऊससाठी निधी उपलब्ध होण्यासंदर्भात शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, युवा सेनेचे शहरप्रमुख निखिल पवार यांनी कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली.
श्रीरामपूर तालुका हा आधुनिक शेती करणारा तालुका आहे. तालुक्यात उस, कांदा, कापूस, सोयाबीन, तेलबिया, डाळिंब आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. हवामान व पावसाच्या लहरीपणामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतीमाल साठवण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे मातीमोल दराने शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करावी लागत असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी मंत्री दादाजी भुसे यांना सांगितले.
जिनिंग मील किंवा कोल्ड स्टोरेजच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांची सोय होईल. शेतमाल साठवून ठेवणे व योग्य भाव आल्यावर त्याची विक्री करणे तसेच येथे उत्पन्न होणाऱ्या कच्च्या मालापासून पक्का माल तयार करून विकल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. त्यासाठी लागणारी जागा श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये उपलब्ध आहे. किंवा इतरत्र जागा उपलब्ध करून देऊ. त्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तताही करून देऊ, असे बडदे यांनी केली मंत्री भुसे यांना सांगितले. सकारात्मक विचार करून पुढील कामास लागण्याची सूचना मंत्री भुसे यांनी केली.सदर प्रस्ताव तात्काळ मंजूर करु, अशी ग्वाही मंत्री दादाजी भुसे यांनी दिली असल्याचे बडदे यांनी सांगितले.