एमबी अहवालांची चौकशीची मागणी; राजेश बोरुडे यांनी केली गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

श्रीरामपूर पंचायत समितीतील बांधकाम उपविभागातील उप अभियंता दालनात उपस्थित नसताना पंखा अविरतपणे चालू ठेऊन विजेचा अपव्यय केला जात आहे.

साईकिरण टाइम्स | ७ नोव्हेंबर २०२०

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग श्रीरामपूर अंतर्गत कोरोना विषाणू प्रादुर्भावादरम्यानच्या काळात झालेल्या कामांच्या एमबी अहवालांची तसेच दलित वस्ती योजनेंतर्गत कामाच्या टेस्टिंग रिपोर्टची चौकशी करून दोषींवर कायदेशीर करावी, अशी मागणी राजेश बोरुडे यांनी श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांच्याकडे केली आहे. 

यासंदर्भात राजेश बोरुडे यांनी तक्रार केली आहे. श्रीरामपूर पंचायत समितीतील बांधकाम उपविभागातंर्गत मागील ९ महिन्यांच्या कालावधीत झालेल्या कामांचे एमबी अहवाल कोणी केले? कामाची प्रत्यक्ष तपासणी, मोजमाप, पाहणी कोणी केली? एमबी अहवालांवर कोणत्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत. कोणत्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत हे अहवाल करण्यात आले? असे अनेक प्रश्न राजेश बोरुडे यांनी उपस्थित करत, या सर्व प्रकारची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दलित वस्ती योजनेंतर्गत झालेल्या कामांच्या टेस्टिंग रिपोर्ट झाले आहेत का? कोणी केले? याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा धरणे, आंदोलन करून संबंधितांच्या दालनास टाळे ठोकू, असा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे. 

येथील उपअभियंता राजेश इवळे अनेकदा दालनात उपस्थित राहत नाही. उप अभियंता इवळे दालनात उपस्थित नसताना त्यांच्या दालनातील पंखा अविरतपणे चालू ठेऊन विजेचा अपव्यय होत असल्याने शासनाच्या म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला आहे. उप अभियंता नेमक्या आठवड्यातील कोणत्या वारी उपस्थित राहतात त्याचा माहितीदर्शक फलक लावावा, असेही बोरुडे यांनी म्हंटले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post