साईकिरण टाइम्स | २४ नोव्हेंबर २०२०
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर सीमेवर गोदातीरी वसलेले 'सरला बेट' येथे भारत मातेच्या रक्षणार्थ लढणाऱ्या वीर जवानांच्या दीर्घायुष्यासाठी सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या चरणी 'एक दिवा' ही संकल्पना २१ हजार दिवे मंदिर परिसरात व ५ हजार दिवे गोदावरी पात्रात अशा २६ हजार दिव्यांचा दीपोत्सव सोहळा नुकताच सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी सुट्टीवर आलेल्या आजीमाजी सैनिकांना सत्कार महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रामगिरी महाराज म्हणाले, भगवान शंकर आदिदेव असून, श्रीरामाने रामेश्वर येथे शिवलिंगाची स्थपना केली. त्याचप्रमाणे रावण देखील शिवभक्त होता. रावण कायम शिवमंदिरात शिवभक्तीमध्ये रममाण होता; तरीही त्याच्या जीवनाचे ध्येय स्वकल्याण होते. रामाच्या जीवनाचे ध्येय जनतेचे व भक्तांचे कल्याण होते. भक्त हा भगवंताच्या सेवेत लीन असतो. श्री हनुमान हे श्रीरामाच्या सेवेत तर नंदी भगवान शंकराच्या सेवेसाठी तयार असतात. संतांनी भगवान आणि भक्त यांचे खूप चांगले वर्णन केले आहे म्हणूनच संतदेखील खूप श्रेष्ठ आहेत. भगवानाची महिमा भक्त आणि संतांनी कायम ठेवला म्हणूनच मनुष्याच्या जीवनात समता, ज्ञान, प्रेम शांती आणि आनंद निर्माण होतो. ज्या देशात संत महापूरुष आणि सद्भक्त जन्म घेतात तो देश महान असतो व जो सैनिक या देशाची सेवा करतो तो सुद्धा ईश्वर असतो.
यावेळी वैजापूरचे आमदार प्रा. रामेश बोरनारे, शिर्डीचे कमलाकर कोते, संदिपशेठ पारख, राहुल गोंदकर, तुकाराम गोंदकर, संजय बोरनारे, विश्वस्त मधुकर महाराज, सोमनाथ महाराज, मेजर सुभाष काकासाहेब जगताप, मेजर मिलिंद भागवत, मेजर नितीन कचरू रोठे, मेजर ज्ञानेश्वर बाळासाहेब खराजे, मेजर दीपक भागवत, परिसरातील महाराज मंडळी,शिर्डी ग्रामस्थ, सरला बेट परिसरातील व बेटातील विद्यार्थी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गंगागिरी महाराज भक्त मंडळ श्रीरामपूर यांनी दीपोत्सवाचे आयोजन केले होते