साईकिरण टाइम्स | 10 ऑक्टोबर 2020
लोणी-संगमनेर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आहे. या रस्त्याच्या मातीने साईडपट्ट्या भरण्याचा केविलवाणा प्रयत्न 'साबा' करत असल्याचा आरोप छावा क्रांतिवीर सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे यांनी केला आहे. दरम्यान, आज (दि.10) या रस्त्याची पाहणी केली तेव्हा मातीने साईडपट्ट्या भरत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे कोल्हे यांनी म्हंटले आहे.
कोल्हे यांनी दि. 19 ऑक्टोबर पासून सा.बा. विभागासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला होता. लोणी-संगमनेर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. याबाबत कोल्हे यांनी सा. बा. विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांच्याकडे दि. 18 सप्टेंबर रोजी तक्रार केली होती. त्यात कोल्हे यांनी म्हटले की, अभियांत्रिकी महाविद्यालय ते आयटीआय स्टॉपपर्यंतचा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. डांबराचा कमी वापर झाल्यामुळे रस्ता खराब झाला आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या गायब आहेत. फक्त मुरूमाच्या साहाय्याने साईडपट्ट्या पसरविण्यात आल्या आहेत. त्यावर रोलर फिरवले नसल्याने साईडपट्ट्या खचून कपाऱ्या तयार झाल्या आहेत. या सर्व रस्त्याच्या कामाचा क्वालिटी कंट्रोल अहवाल ज्या अधिकाऱ्यांनी दिला त्याचीही चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली होती.