साईकिरण टाइम्स | 11 ऑक्टोबर 2020
बेलापुर (प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुक्यात पांढरे सोने मोठ्या प्रमाणात पिकविले जात असले, तरी तालुक्यात शासकीय कापुस खरेदी केंद्र नसल्यामुळे खाजगी व्यापारी मन मानेल त्या पध्दतीने शेतकऱ्यांची लुट करत असल्याचा, आरोप डॉ. मिलींद बडधे पाटील यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात डॉ. बडधे यांनी पुढे म्हटले आहे की, कमी पाण्यात येणारे व शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवुन देणारे पिक म्हणजे कापुस. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी कापसाकडे वळला आहे. तालुक्यात जवळपास ५० ते ६० हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली असुन मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कपाशीचे मोठे नुकसान झालेले आहे. ज्या थोड्याफार कपाशा वाचलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना एक फार मोठा आधार असणार आहे. आता कापुस वेचणीला सुरुवात झाली असुन खाजगी व्यापाऱ्यांनी मन मानेल त्या भावाने कापुस खरेदी सुरु केलेली आहे.
अशी होते लूट....
कापसाचा सरकारी हमी भाव प्रति क्विंटल ५८२५ रुपये असला तरी खाजगी व्यापारी ३०००ते ३५०० या भावाने खरेदी करत आहे. त्यातही आगोदर भाव वेगळाच ठरवतात. मात्र कापुस विक्रीसाठी नेल्यावर कापुस खराब असल्याच्या नावाखाली वजन केल्यावर वेगळाच भाव काढतात. त्यातही वजन काट्यात तफावत असते. त्यामुळे आगोदर सर्व व्यापार्यांची वजनकाटे प्रमाणीत करुन घ्यावीत. जेणे करुन वजनात शेतकऱ्यांची लुट होणार नाही. हे खाजगी व्यापारी शेतकर्यांची लुट तर करतातच. परंतु, बाजार समितीचाही सेस बुडवितात.कापुस खरेदी केल्यावर व्यापारी पक्के बिलही देत नसल्याचा आरोपही डाँक्टर बडधे यांनी केला, असुन शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालावे, अशी मागणीही डाँक्टर बडधे यांनी केली आहे.